Mahrashtra Politics : खरंच उदय सामंत एकनाथ शिंदेंना जय महाराष्ट्र करतील का ?
प्रशांत गोडसे-मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या इतिहासात विधानसभा निवडणुकीत (Assembly election) महायुतीने ऐतिहासिक यश संपादित करत सत्तेत विराजमान झाले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला बहुमतात असताना देखील मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये असंतोष असल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा विरोधक करीत आहे. शिंदेच्या शिवसेनेचे (Shivsena) मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे काही आमदार घेऊन भाजपच्यासोबत (BJP) अशा प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहे. खरंच उदय सामंत भाजपाशी घरोबा करून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जय महाराष्ट्र करतील का ? यावर आता तर्कवितर्क लावले जात आहे.
2022 पासून मैत्रीची सुरवात
उदय सामंत ह्यांनी आपला राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुरु केला होता. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष,आमदार, राज्यमंत्री त्यानंतर शिवसेना पक्षात प्रवेश करून कॅबिनेटमंत्री झाले महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर शिंदेंसोबत जाऊन युती सरकारमध्ये उद्योगमंत्री झाले. तेंव्हापासून त्यांची आणि तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक पाहायला मिळाली. मात्र आपण थोडं भुतकाळात गेलो तर लक्षात येईल की जेव्हा शिवसेना पक्षात नेते एकनाथ शिंदे यांनी उठाव करून आमदारचा एक गट गुहावटीला गेले होते. त्यावेळी उदय सामंत हे उशिरा गुहावटीला गेले होते आपण पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं मन वळविण्याचा प्रयत्न करत असल्याच मत व्यक्त केले होते. तेंव्हा देखील उदय सामंत यांनी दोन्ही ठिकाणी हात ठेवत सेफ राजकारण केले असल्याची चर्चा होती. तसेच त्याच दरम्यान आशा देखील चर्चा समोर आल्या होत्या की, त्याच दरम्यान एकनाथ शिंदे हे परत उद्धव ठाकरे यांच्याकडे म्हणजे स्वगृही जाणार असल्याच बोलले जात आहे. त्याच कालावधी सामंत हे तत्कालीन विरोधीपक्ष नेत्यांची भेट घेऊन शिंदे येणार नसतील तर मी यायला तयार आहे, आपल्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या देखील दिली होती. त्याच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे अशी अपेक्षा ठेवली होती. मात्र विरोधी पक्ष नेते यांनी त्यांना स्पष्ट सांगितले होते की आम्ही शिंदे यांना शब्द दिले असल्यामुळे आता तुमच्या ऑफरचा विचार होणार नसल्याचं सांगितले गेले होते. त्याबाबतच्या चर्चा तेंव्हा देखील रंगल्या होत्या. म्हणजे 2022 पासूनचं सामंत यांची फडणवीस यांच्यातील जवळीक वाढायला सुरवात झाली.
उपमुख्यमंत्रीपदासाठी
सामंत नावाची दुसऱ्यांदा चर्चा
महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर युतीच्या सरकारचे रूपांतर महायुती सरकारमध्ये झाले. गेल्या सरकारमध्ये उद्योगमंत्री असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. महायुतीला बहुमत मिळाले आणि भाजपा सर्वात जास्त जागा जिंकून मोठा पक्ष ठरला. विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृवाखाली महायुतीने लढल्या होत्या. त्यामुळे शिंदे यांना पुढे एक वर्षासाठी मुख्यमंत्री करतील अशी अपेक्षा शिंदे शिवसेना, कार्यकर्त्यांना होती. परंतु मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले होते. उपमुख्यमंत्रीपद शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला आले. त्याच काळात माजी मुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे नाराज होते. त्या काळात शिंदे उपमुख्यमंत्री घेणार नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या तेंव्हा देखील उदय सामंत उपमुख्यमंत्री पदासाठी ईच्छुक असल्याच समोर आला होत, तेंव्हा देखील त्यांनी 2022 सालाप्रमाणे फडणवीस यांना आपली महत्वकांक्षा बोलून दाखवली असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली. उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे स्वीकारणार नसून उदय सामंत उपमुख्यमंत्री होऊ शकतात, अशा बातम्या सुरु झाल्या तेव्हा उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आमचे नेते जर मंत्रिमंडळात राहणार नसतील तर शिवसेनेकडून कोणीही मंत्रीपदाची शपथ घेणार नसल्याच म्हटले होते. आपल्याविषयी कोणीतरी अफवा पसरवित असून मला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले होते.दुसऱ्या वेळी उदय सामंत यांच्या नावाची चर्चा सुरु झाली असल्यामुळे त्यांच्याबाबत शंका उपस्थिती केली जाऊ लागली आहे.
फडणवीस-सामंत साथ साथ
राज्य सरकारकडून शनिवारी पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. मात्र नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदावरून महायुतीत असंतोष दिसला. तर यादीवरून उपमुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याने दरे गावी निघून गेले आहे. राज्य सरकारकडून रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्रीपदाच्या नावाला स्थगिती दिली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यावर त्यावर निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना पक्ष सत्तेत असताना नाराज आहे की समाधानी आहे याचा विचार करता दुसऱ्या बाजूला मात्र उदय सामंत फडणवीस यांच्यासोबत परदेशात असून दोघांची मैत्री अधिकच दृढ होत असल्याचे बोलले जात आहे.
सर्व काही मिळाले, मग का असा निर्णय घेतील
कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. कोकण शिवसेनेकडे राखण्यात शिवसेना म्हणजे उदय सामंत यांना यश आले आहे. शिवसेना भाजपा युती सरकारमध्ये उदय सामंत यांना उद्योगमंत्री मिळाले. पुन्हा महायुती सरकारमध्ये हवं असलेले उद्योगमंत्री पद मिळाले. त्यासोबत आपल्याला हवं असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले भाजपाला कोकणात सामंत यांचा फायदा होऊ शकतो. तसेच वारंवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुसवे फुगवे यांना पर्याय म्हणून उदय सामंत यांचा विचार केला जाऊ शकतो. शिवसेना पक्षातच चेकमेट करून भाजपासोबत चूल मांडणे उदय सामंत यांना कितपत लाभेल हे आता सांगता येणार नाही. तसेच भाजपाला देखील आता आशा प्रकारचे राजकारण मान्य नसणार आहे. आधीच लोकसभा, विधानसभा निवडणूक काळात पक्ष फोडा, आमदार फोडा फोडीवर विरोधकांनी भाजपाला लक्ष केलेच होती. आता तरी स्थानिक स्वराज्य संस्थच्या निवडणूक डोळ्यासमोर असल्यामुळे सामंत किंवा भाजपा असा राजकीय खेळ करणार नाही.
ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि ठाकरे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केली असून उदय सामंत यांच्या शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रति असलेल्या एकनिष्ठवर प्रश्नचिन्ह उपस्थिती केले आहे. तर आपल्याला बदनाम केले जात असून आमचे नेते शिंदे आणि माझ्यात दुरावा निर्माण करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे उदय सामंत आणि भाजपा वेगळं समीकरण पाहायला मिळेल का ह्या जर तरच्या गोष्टी आहे. याबाबत त्याच वेळी स्पष्टता समोर येईल मात्र तूर्तास तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत जोडी फेविकाल का जोड है तुटेगा नही असं म्हणायला काही हरकत नाही.