‘एकही बांगलादेशी फेरीवाला दिसता कामा नये’; नेवाशात किरीट सोमय्यांचा प्रशासनाला इशारा
नागरिकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर सोमय्या यांनी या प्रकरणात पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली.
Kirit Somaiya’s warning to the administration : महाराष्ट्रातील अनेक हिंदू मंदिरांच्या परिसरात बांगलादेशी नागरिक, ड्रग माफिया आणि फेरीवाल्यांकडून अतिक्रमणे केली जात असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. नेवासा येथील घटनाही याचाच एक भाग असल्याचा दावा करत त्यांनी या प्रकरणावरून जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. मंदिरांच्या परिसरात ठरवून अतिक्रमणे केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
किरीट सोमय्या यांनी काल नेवासा येथे भेट देऊन पैस खांब मंदिरात दर्शन घेतले. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांची भेट घेत मंदिर परिसरातील कथित अतिक्रमणांबाबत निवेदन दिले. नागरिकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर सोमय्या यांनी या प्रकरणात पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान सरकारी कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याचा दावा करत सोमय्या यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. नगरपालिकेने सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत तक्रार दिली नाही. पोलिसांनीही ज्याला मारहाण झाली त्याची केवळ तक्रार घेतली, मात्र स्वतःहून कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मी पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाला 24 तासांचा इशारा दिला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणे आणि छेडछाड करणे यासंदर्भात गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तसेच या प्रकारामागे असलेल्या माफियांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
‘हिरो कोण विचारलं तर एकानं खान, दुसऱ्यानं पुष्पा सांगितलं’; समीर वानखेडेंचं नव्या पिढीवर भाष्य
मंदिर परिसरातील कथित बेकायदेशीर फेरीवाल्यांवरही त्यांनी कारवाईची मागणी केली. 24 तासांनंतरही या परिसरात बेकायदेशीर फेरीवाले आढळल्यास नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला त्याबाबत जाब विचारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. कारवाई केल्यास दंगल होईल किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, या भीतीमुळे प्रशासन कठोर भूमिका घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईतही अशाच प्रकारे पोलिसांनी कारवाई टाळल्याचा दावा करत यापुढे अशी भूमिका सहन केली जाणार नसल्याचे सोमय्या म्हणाले.
मंदिर परिसरात हिंदू भाविकांना फेरीवाल्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत सोमय्या यांनी या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित केला. संबंधित घटनेत पोलिसांनी बोटचेपीची भूमिका घेतल्याचा आरोप करत आपण पोलीस प्रशासनाकडे याबाबत जाब विचारल्याचे त्यांनी सांगितले. नेवासा येथील मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई झाली नाही तर आपण स्वतः मंदिर परिसरात येऊन आंदोलन करू, असा इशाराही सोमय्या यांनी दिला. मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात यावा आणि तेथे बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्यांवर तसेच कथित माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने २४ तासांच्या आत ठोस पावले उचलावीत, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.