कोपरगावात भरदिवसा हातात तलवारी घेऊन ज्वेलर्सचे दुकान लुटले पण ग्रामस्थांनी डाव हाणून पाडला
Kopargaon News : कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील पोहेगाव (Pohegaon) येथे भर दिवसा हातात नंग्या तलवारी घेऊन ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा दरोडेखोरांचा डाव सतर्क ग्रामस्थ व दुकानदार यांनी धुडकावून लावला आहे. मात्र या थरारक घटनेने पोहेगाव परिसरसह कोपरगाव तालुका हादरून गेला आहे.
माहितीनुसार, पोहेगावं ग्रामपंचायत हद्दीत व्यापारी संकुलात असलेल्या ज्ञानेश्वर माधवराव माळवे (वय 55) यांच्या सुवर्णकाराच्या दुकानावर आज मंगळवारी सायंकाळी 5.45 वाजता अज्ञात तीन दरोडेखोरांनी भरदिवसा हातात नंग्या तलवारी घेऊन दरोडा टाकत दरोडेखोर दुकानातील सोने चांदी लुटून घेऊन जात असताना नागरिकांनी सतर्कता दाखवत त्यांना घेरावा घालून दगडाचा मारा केला व ग्रामस्थांनी बाजार तळाजवळ त्या दोन दरोडेखोरांना पकडले असून यातील एक दरोडेखोर पलायन करण्यात यशस्वी झाला आहे.
या झटापटी दुकानदार ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून या घटनेचा लाईव्ह थरार अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. दरम्यान सायंकाळी 5.45 वाजेच्या सुमारास हातात तलवारी त्या दरोडेखोरांना दुकानात प्रवेश केला होता.
चोरट्यांनी आत प्रवेश करून सर्व सोने, नाणे आपल्या गाठोड्यात बांधून बाहेर निघाले व जातांना त्यांनी आपल्या हातातील तलवार घेऊन सुवर्णकार यांना बचावासाठी आपल्या सोबतघेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना उपस्थित ग्रामस्थांच्या ही गंभीर बाब लक्षात आली त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्यास दगडांचा भडिमार केला असता चोरट्यांनी तलवार घेऊन दहशत पसरवून उपस्थितांना घाबरविण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थ मोठया संख्येने जमा झाल्याने त्यांचा पळून जाण्याचा डाव फसला असून त्यातील दोन जणांना ग्रामस्थांनी पकडले मात्र एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान आरोपीकडे तलवारी सह गावठी कट्टा, चाकू, सुरे आदी हत्यारे असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी दिली आहे.
ग्रामस्थांनी दरोडेखोराना उघडे करून चांगला चोप दिला असून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान पोलिस उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामने यांनी आपले पथकासह घटनास्थळी हजर होऊन आरोपींना आपल्या ताब्यात घेऊन शिर्डीकडे प्रयाण केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र सदर चोरट्यांनी किती माल गुंडाळला होता याचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही.
Prakash Abitkar : अवैध गर्भपात प्रकरणी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर ॲक्शन मोडवर
सदर सुवर्णकारास जीवावर बेतले होते मात्र ते बोटावर निभावले असल्याची नागरिकांत चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांनी सजगता दाखवल्याने त्यांचा जीव व माल वाचला आहे. मात्र या झटापटीत त्यांना किती मारहाण झाली याचा अद्याप खुलासा झालेला नाही. दरम्यान या घटनेने पोहेगाव आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.