ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने हळहळ, पंतप्रधानांसह कुणी कुणी वाहिली श्रद्धांजली?

रविवारी (दि.12) त्यांचं निधन झालं. आशा भोसले यांना पंतप्रधानांसह सर्वांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

News Photo   2026 04 12T151800.874

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं रविवारी निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची अष्टपैलू गायिका म्हणून ओळखलं जायचं. शनिवारी (11 एप्रिल) त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी (दि.12) त्यांचं निधन झालं. आशा भोसले यांना पंतप्रधानांसह सर्वांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

कोण काय म्हणालं?

भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन. त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या भावपूर्ण संवेदना. त्या पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी सदैव लोकांच्या आयुष्यात गुंजत राहतील”.

नरेंद्र मोदी -पंतप्रधान

महान गायिका आशा भोसलेजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत हृदयद्रावक आहे.
त्यांच्या आवाजातून त्यांची कला आपल्यात कायम अमर राहील. या दुःखद प्रसंगी, त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांप्रति आणि चाहत्यांप्रति माझ्या संवेदना आहेत.

राहुल गांधी, विरोधी पक्षनेते लोकसभा

तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनानं मंगेशकर घराण्यातील लतादीदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली. आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्‍या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’ आणि ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्‍या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणं नाही. अलिकडंच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्हीसोबत होतो. त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर…’ हे गाणं माझ्याकडून गाऊन घेतलं होतं आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावलं’, असं त्या म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, ॐ शांति”

देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री

आशा भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘चुरा लिया है तुमने’ यासारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गायकीत आधुनिकतेसोबतच पारंपरिकतेचा सुंदर संगम दिसून येतो. आशा भोसले यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रति असलेल्या निष्ठेचं प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील श्रोत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीतसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. आपल्या कर्तृत्वानं संगीत क्षेत्रात त्यांनी मानाचं स्थान निर्माण केलं. त्यांच्या अद्वितीय योगदानामुळं त्यांना जागतिक स्तरावरही विशेष ओळख मिळाली होती. आशा भोसले यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो,

सुनेत्रा अजित पवार – उपमुख्यमंत्री

गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या दुःखद निधनाने गेल्या चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा, आणि मनामनांना एका चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला आहे. आशाताईंचा स्वर कानावर पडला नाही, असा दिवस गेल्या अनेक दशकांत उजाडला नाही, आणि मावळलाही नाही. या स्वराने असंख्य क्षण फुलविले, आणि फुलवत शकुनाच्या मेंदीने रंगलेले जगण्याचे असंख्य क्षण हसविलेदेखील. आशाताई ऐहिकदृष्ट्या आपल्यात नाहीत ही जाणीव पचविणे अवघड आहे, पण त्या स्वरांची सोबत मात्र कायम राहणार आहे. कारण या स्वरांचा साज कालातीत आहे. अनेक वेळा आशाताईंनी भेटण्याचे भाग्य मला लाभले, ते अविस्मरणीय क्षण कायमस्वरूपी माझ्या मनात अजरामर राहतील. आशाताईंच्या आत्म्यास सद्गती लाभावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही संपूर्ण शिवसेना परिवार त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहोत.

एकनाथ शिंदे -उपमुख्यमंत्री

‘आशाताई’ -दि लास्ट एम्परर ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात. लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं.  तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं.  तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच , ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं.  ‘गाणं हे माझं पॅशन आहे’ किंवा ‘ऍक्टिंग माझं पॅशन आहे’ असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात.   असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली.  मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत.  ‘पिया तू अब तो आजा’ मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. ‘आईये मेहरबान’ मध्ये लडिवाळपणा आहे, ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए’ मध्ये नजाकत आहे. ‘दम मारो दम’ मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात. व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या. जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील.  मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील , ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं  ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी  आपल्याला घालून दिला ! जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या  रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या  रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला ! आशाताईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.

राज ठाकरे, प्रमुख मनसे

आशाताईंच्या रूपानं भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळं संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेलं अढळ स्थान कायम राहील. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी (शप)

भारतीय संगीत क्षेत्रात आपल्या कलेच्या माध्यमातून अमीट असा ठसा सोडणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांचे आयुष्य, गायन कलेसाठी त्यांनी केलेली साधना येणाऱ्या अनेक पिढ्यांना, उदयोन्मुख कलावंतांना प्रेरणा देत राहील, त्यांचे आप्तस्वकीय, संगीतप्रेमी श्रोते यांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, ही प्रार्थना!

हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र आकंठपणे दुःखात बुडाला आहे. एका युगाचा अंत झाला आहे. आपल्या आशाताई आपल्यातून निघून गेल्या आहेत. आशाताईंचं असणं हे वर्षानुवर्षे समाधानाची अनुभूती देत होतं. आपण दुःखाला कवटाळून लोकांना आनंद देणं ही त्यांची खासियत होती. त्यांचं कर्तृत्व जगाला वेड लावणारं होतं. अशा आशाताई आज आपल्यात राहिल्या नाहीत. आता कुटुंबानं सांगितल्याप्रमाणं उद्या त्यांचं पार्थिव त्यांच्या लोअर परळ येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल. तिथं लोकांना अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचं नसणं हे आपल्याला आयुष्यभर दुःख देणारं आहे.

आशिष शेलार, मंत्री भाजप

सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या, आपल्या सुमधुर आवाजानं संगीत क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. पद्मविभूषण, ग्रॅमी, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित आशाताई म्हणजे भारतीय संगीताचा जगप्रसिद्ध आवाज होत्या. त्यांच्या निधनानं संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली!,

विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते

आशा भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दु:ख झालं. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला. त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला, भावनांना स्पर्श केला. त्या एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व होत्या. लता दीदी यांच्यानंतर त्या संगीत क्षेत्रातील एका महान पर्वाच्या स्तंभाप्रमाणं उभ्या होत्या. भारतीय संगीत क्षेत्रातील हा स्तंभ कोसळला. त्यांचं गाणं हेच त्यांचं अमरत्व राहील. त्यांच्या स्मृतीला विनम्र श्रद्धांजली,

उद्धव ठाकरे, प्रमुख शिवसेना

follow us