Sujay Vikhe- Patil: शिर्डीत आजपासून ‘महापशुधन एक्सपो’; शेतकऱ्यांसाठी पर्वणी
अहमदनगर: देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो’चे उद्या (ता. २४) ते रविवार (ता. २६) शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. शेती महामंडळांच्या ४६ एकर जागेवर होणाऱ्या या प्रदर्शनात देशातल्या १६ राज्यातील पशुधनाच्या ६५ प्रकारांच्या जातीवंत प्रजाती आपणास पाहण्यास मिळणार आहेत. ३ दिवसांच्या या प्रदर्शनात देश-राज्यपातळीवर ५ लाख पशुप्रेमी नागरिक भेट देण्याची शक्यता आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर होणारा हा ‘महापशुधन एक्स्पो’ शेतकरी, पशुपालक, तरूणांसाठी पर्वणी ठरणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe- Patil) यांनी दिली.
‘महापशुधन एक्सपो संदर्भात डाॅ. विखे पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. पशुसंवर्धन विभागाचे राज्याचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, अतिरिक्त आयुक्त शीतलकुमार मुकणे, अहमदनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे आदी उपस्थित होते. या प्रदर्शनाचे उद्धाटन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे. जिल्हा नियोजनांच्या माध्यमातून या प्रदर्शनासाठी पशुसंवर्धन विभागास अडीच कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे.
अहमदनगरमध्ये रंगणार कुस्त्यांचा आखाडा; विजेत्यास मिळणार साेन्याची गदा
राज्यातील ३५ जिल्ह्यांच्या स्टॉलच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याचे पशुसंवर्धनविषयक वैशिष्ट्यांची माहिती सर्वसामान्य जनतेसाठी खुली राहणार आहे. त्या त्या राज्यातील आणि जिल्ह्यातील प्रसिध्द व वैशिष्टयपूर्ण पशुधन या प्रदर्शनात प्रत्यक्ष सहभागी राहणार आहेत. गायी, म्हैस, शेळी– मेंढी, कोंबडी, श्वान, वराह, अश्व असा अनेक पशुप्राण्याचे विविध प्रकारांतील सर्वोत्कृष्ट प्रजाती आपणास या ‘एक्स्पो’त पाहण्यास मिळणार आहे.
शेतकरी, पशुपालकांसाठी उपयुक्त ठरणारे वैरण विकास, दूग्ध व्यवसायात आवाहने, शेळी- मेंढीपालन, कुक्कुटपालन याविषयांवर तांत्रिक चर्चासत्र याठिकाणी होणार आहेत. या चर्चेमध्ये शेतकरी सहभागी होऊ शकतात. पशुसंवर्धनविषयक नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. मुक्त संचार गोठा कसा असावा याचे प्रात्यक्षिक आणि माहिती या एक्स्पोत दिली जाणार आहे. पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून शासकीय योजनांचे सादरीकरणाचे कार्यक्रम देखील होणार आहेत.