संसद भवन, केजरीवाल दौरा अन् चहाचा हिशोब; शिंदेंनी एक एक करत विरोधकांना धुतलं
Eknath Shinde : ‘संसद भवनाच्या उद्घाटनावरून काही लोकांना पोटशूळ उठला आहे, ही पोटदुखी आहे. संसद भवन हे पवित्र मंदिर आहे त्याला विरोध कसला करताय? केजरीवाल मुंबईत येतात शरद पवारांना भेटतात. पंतप्रधान मोदींचं जे काम आहे त्याला घाबरून हे सगळं होतंय. आम्ही कुणाच्या दारात जात नाही. आपलं शासन हे सर्वसामान्यांच्या दारी जातंय, हा खरा फरक आहे.’
‘आम्ही फिल्डवर काम करणारे आहोत. चोवीस तास काम करणारे लोक आहोत. म्हणून लोकं आमच्याकडे येतात. लोक माझ्याकडे आल्यानंतर त्या चहाचाही कुणी हिशोब काढतात. माझ्याकडे येणारी सोन्यासारखी माणसं आहेत त्यांच्यासाठी मी चहा आणि पाणी देऊ शकत नाही’, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांचे वाभाडे काढले.
फडणवीसांनी पटोलेंबरोबर राऊतांनाही ओढलं; म्हणाले, हे लोक नुसतेच बोलघेवडे
छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील कन्नड येथे आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात शिंदे बोलत होते. यावेळी रोजगार हमी मंत्री सांदिपान भुमरे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाले, ‘आधी लोकांना सरकारच्या दारात जावं लागत होतं. पण मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं की आपणच लोकांपर्यंत जायचं. त्यांना प्रत्येक कामासाठी सरकारी कार्यालयं आणि मुंबईत तरी का बोलवायचं, त्यातून ही संकल्पना सुरू केली. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 321 प्रकल्प आहेत. याद्वारे 5 हजार 457 कोटी रुपयांचा निधी वाटप होणार आहे. जवळपास 1 लाख 49 हजार 575 लाभार्थी आहेत. असे प्रकल्प पुढे न्यायचे असतील तर त्यासाठी आपल्याला केंद्राचा पाठिंबा पाहिजे.’
‘आज जगभरात आपल्या देशाला मान मिळतोय पण काही लोकं बाहेर जाऊन आपल्या देशाची बदनामी करत आहेत. कितीही काहीही करा पण तुमचं काम बोलत असतं. काँग्रेसच्या आधीच्या सरकारांनी गरीबांना गरीब ठेवण्याचं काम केलं. पण 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर लोकांना गरीबीतून वर काढण्याचे काम या सरकारने केलं.’
हा पोटशूळ अन् पोटदुखी
‘संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन लवकरच करायचं आहे. 2019 मध्ये संसदेच्या इमारतीचे स्वप्न मोदींनी पाहिले होते. 2023 मध्ये नवे संसद भवन प्रत्यक्षात आले. हे एक ऐतिहासिक काम आहे त्याला कसला विरोध करताय? म्हणजे ही पोटदुखी आहे. हा पोटशूळ आहे. या कार्यक्रमाला विरोध होण्याचे कारण म्हणजे या कामाचे क्रेडिट मोदींना मिळेल म्हणून त्यांना पोटदुखी होत आहे. तुमच्या (काँग्रेस) लोकांनीही आधी अशी उद्घाटनं केली तेव्हा कुणीही विरोध केला नाही’, अशी टीका शिंदे यांनी केली.
आम्ही कुणाच्या दारात जात नाही
‘केजरीवाल मुंबईत येतात एकाला भेटतात दुसऱ्याला भेटतात. हे केवळ मोदीचं जे काम आहे त्याला घाबरून हे सगळं होतय पण, आम्ही कुणाच्याही दारी जात नाही. आपलं शासन हे सर्वसामान्यांच्या दारी येतंय हा त्यांच्यातला आणि आपल्यातला खरा फरक आहे’, असा टोला शिंदे यांनी लगावला.
शिंदेंना आठवला चहाचा हिशोब
‘कितीही एकत्र आले तरीही या देशातील या राज्यातील जनता सूज्ञ आहे. अडीच वर्ष घरात बसलेल्यांच्या (उद्धव ठाकरे) की जनतेत जाऊन काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहणार हे लोकांना सांगण्याची गरज नाही. आम्ही फिल्डवर काम करणारे आहोत. चोवीस तास काम करणारे लोक आहोत. म्हणून लोकं आमच्याकडे येतात. लोक माझ्याकडे आल्यानंतर त्या चहाचाही कुणी हिशोब काढतात. त्यावेळी मी सांगितलंही होतं. ते म्हणाले (अजित पवार) चहात सोन्याचं पाणी टाकता का? मी म्हणालो हो. माझ्याकडे येणारी माणसं सोन्यासारखी आहेत त्यांच्यासाठी मी चहा आणि पाणी देऊ शकत नाही?, असा सवाल करत त्यांनी नाव न घेता अजित पवार यांना टोला लगावला.