अयोध्या दौऱ्यासाठी तीन ट्रेन, दोन विमान; मंत्री आमदार अन् कार्यकर्त्यांची खास बडदास्त
प्रफुल्ल साळुंखे
( विशेष प्रतिनिधी)
Eknath Shinde Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्या दौऱ्यावर गेले. शिवसेनेचे मंत्री आणि आमदार, खासदार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी तसेच आमदार देखील या दौऱ्यात सोबत होते. शिंदे यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते देखील दाखल झाले होते. या सर्वांची व्यवस्था देखील तितकीच अवाढव्य होती.
एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी एक वातावरण तयार करण्यात कार्यकर्ते आणि टीम यशस्वी झाली. या दौऱ्यात कार्यकर्त्यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. मुंबई ठाणे येथून हजारो कार्यकर्ते रेल्वेने अयोध्येत दाखल झाले होते. यासाठी ठाणे येथून दोन ट्रेन तर नाशिक येथून एक अशा तीन स्वतंत्र ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. दौऱ्यात मंत्री, आमदार, खासदार आणि त्यांचे सहाय्यक यांच्यासाठी स्वतंत्र विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. पत्रकार, पदाधिकारी यांच्यासाठी देखील विमानाची व्यवस्था करण्यात आली होती.
मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्ला : रावणराज चालवले… म्हणूनच जनतेने त्यांना हटवले!
मुख्यमंत्री, उपमुखमंत्री आणि मंत्री यांच्यासाठी उत्तरप्रदेश सरकारच्या प्रोटोकॉल वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. पण आमदार खासदार यांच्यासाठी दोन बस, महत्वाचे पदाधिकारी, पत्रकार आणि काही कार्यकर्ते यांच्यासाठी असलेल्या वाहनांची संख्या जवळपास दोनशेपेक्षा जास्त असल्याचे समजते.
आमदार खासदार मंत्र्यांसाठी स्वतंत्र हॉटल तर पत्रकार यांची हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मुंबई ठाणे नाशिक येथून आलेल्या सर्व कार्यकर्ते यांची हॉटल, आश्रमशाळा, गेस्टहाऊस विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. साधारण पाच ते दहा हजार जणांच्या या अयोध्या दौऱ्याने वातावरण शिवसेनामय झाल होते हे मात्र नक्की.