मंत्री सावंतांचा गौप्यस्फोट ! बंडाची सुरुवात फडणवीसांच्या आदेशाने; मी घेतल्या दीडशे बैठका
Tanaji Sawant : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत फूट पाडली. त्यानंतर भाजपच्या मदतीने राज्य सत्तांतरही घडवून आणले. या बंडाच्या पाठीमागे भाजपचा हात असल्याचे आरोप त्यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून वारंवार केले गेले. आता राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गौप्यस्फोट करत यावरच शिक्कामोर्तब केले आहे.
सावंत म्हणाले, बंडासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मी तब्बल दीडशे बैठका केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच बंडाला सुरुवात केली, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांत भाषणात त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
Gunaratna Sadavarte : सदावर्तेंना मोठा धक्का; दोन वर्षांसाठी सनद रद्द
ते पुढे म्हणाले, या बंडासाठी मी फडणवीस यांच्याबरोबर जवळपास दीडशे बैठका घेतल्या. तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील आमदारांना बंडासाठी तयार करण्याचे कामही करत होतो. विशेष म्हणजे, मी या सगळ्या गोष्टी सांगून करत होतो कोणतीही गोष्ट कधी लपूनछपून केली नाही. मंत्री सावंतांच्या या वक्तव्यामुळे आता राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अद्याप यावर काही प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत.
खोक्यांची टीका अंगलट; दिल्ली उच्च न्यायालयाचे ठाकरे पित्रापुत्रासह राऊतांना समन्स
30 डिसेंबर 2019 रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यानंतर पहिल्यांदा 3 जानेवारी दरम्यान मी आणि सुजितसिंह ठाकूर यांनी फडणवीस यांच्या आदेशाने बंडखोरी करत जिल्हा परिषदेत भाजप आणि शिवसेनेची सत्ता आणली. तसे पाहिले तर धाराशिव जिल्ह्यातूनच बंडाची सुरुवात झाली. आम्ही तेव्हापासूनच बंडाचा झेंडा फडकावला होता.
दरम्यान, मंत्री सावंत यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांकडून भाजपवर जे आरोप होत होते ते कुठेतरी खरे असल्याचे दिसून येत आहे. कारण, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात भाजपचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात होता. आता तर खुद्द सरकार पडल्यानंतर नव्या सरकारमधील मंत्रीच थेट फडणवीस यांच्या आदेशाने बंड केल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे हे बंड कुणाच्या आशिर्वादाने केले गेले हे आता उघड झाले आहे.