घराला मोजपट्टी पाहताच आमदारही रडला, कंठ आला दाटून.. हुंदका आवरत सांगितला घटनाक्रम

घराला मोजपट्टी पाहताच आमदारही रडला, कंठ आला दाटून.. हुंदका आवरत सांगितला घटनाक्रम

रत्नागिरी : स्वतःच्या कष्टातून रक्ताचे पाणी करून उभे केलेल्या घराचे जर डोळ्यांदेखत काही नुकसान होत असेल तर डोळ्यांतून पाणी येणारच. असाच प्रसंग एका आमदारावर आला. मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या घराला मोजपट्टी लावल्याचे पाहताच आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांचे डोळेही अश्रूंनी डबडबले.

डोळ्यांदेखत घराची मोजणी होत असल्याचे पाहताच त्यांना भावना अनावर झाल्या. ‘असा प्रसंग माझ्यासारख्या आमदारावर आला. ज्याने राजकारणाचा कोणताही आधार न घेता केवळ व्यवसायातून मिळालेल्या पैशांतून हे घर उभे केले. ही माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद घटना आहे. माझ्या डोळ्यांतील अश्रू या सरकारला बाधल्याशिवाय राहणार नाहीत,’ अशा शब्दांत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी भावना व्यक्त केल्या.

एसीबीमार्फत आमदार राजन साळवी यांच्या मालमत्तांची चौकशी सुरू आहे. त्यानुसार त्यांच्याकडे ज्या मालमत्ता आहेत यांची माहिती घेतली जात आहे. त्यांच्या घराचीही मोजणी करण्यात आली. या कारवाईबद्दल बोलताना आ.साळवी म्हणाले, की ‘मालमत्तेबाबत काही दिवसांपासून एसीबीकडून माझी चौकशी सुरू आहे. चौकशीत जी माझी मालमत्ता आहे त्याबाबत मी त्यांना माहिती दिली आहे पण, त्यांचे समाधान काही होत नाही. सतत मला अलीबागला बोलावतात.’

वाचा : Rajan Salvi : ठाकरेंच्या आणखी एका आमदाराभोवती ‘एसीबी’ चौकशीचा फास

‘मुंबईला अधिवेशनात असताना त्यांनी माझ्या वडिलोपार्जित घराचे मोजमाप केले. नंतर हॉटेलचेही मोजमाप केले. आज घरी आलो असताना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की घराचे मोजमाप करायचे. त्यांनी मोजमापासाठी टेप लावला. टेप लावल्यानंतर मला भरून आले.

आठ वर्षांपूर्वी जागा घेऊन मी घर बांधले. त्यासाठी 25 लाखांचे कर्जही घेतले. मी आठ वर्षांपूर्वी ज्यावेळी येथे आलो त्यावेळी घराच्या भिंती, प्लास्टर एवढेच होते. परंतु, दोन वर्षांनंतर फर्निचर केले. त्यानंतर मी कष्टाने उभे केलेले घर पहायला मिळाले. पण काय पहायला मिळाले तर मोजमाप करताना.’

‘मोजपट्टी लावताना पाहिलं भरून आलं. असा प्रसंग माझ्यासारख्या आमदारावर आला ज्याने स्वकष्टाने व्यवसायातून हे घर उभे केले. ही आयुष्यातली दुःखद घटना आहे आणि माझे हे अश्रू आहे हे सरकारला बाधतील,’ असा इशारा त्यांनी दिला.

Sanjay Raut : 2024 साली सांगलीचा ‘कसबा’ होईल, राऊतांचा भाजपला इशारा

ते पुढे म्हणाले, की शिवसेनेने (Shivsena) मला सर्व काही दिले. पण हे घर आणि जे काही आहे ते मी व्यवसायातून उभे केले राजकारणातून नाही. परंतु, आज माझ्यासमोर माझे घर मोजताहेत ही सर्वात वाईट घटना आहे.

मी राजकारणात असल्याने मला असे धक्के सहन करण्याची करण्याची सवय आहे. कुटुंबियांना मात्र धक्का बसला असून ते या धक्क्यातून सावरत आहेत.’ ‘मी लोकप्रतिनिधी असलो तरी सुद्धा शेवटी मी एक वडील आहे मला पत्नी आहे. मुलं आहेत. मी एक माणूस आहे. मनाला दुःख होते त्यावेळी डोळ्यांतून पाणी येते. आज माझा आधार गेल्यासारखे मला वाटत आहे,’ अशा भावना साळवी यांनी यावेळी व्यक्त केल्या.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube