‘हा तर ‘त्या’ करोडो लोकांचा विश्वासघातच’; टूथपेस्ट वादात आव्हाडांची रामदेव बाबांवर आगपाखड
Baba Ramdev Patanjali Legal Notice : देशात प्रसिद्ध असलेल्या पतंजली कंपनीच्या (Patanjali) टूथपेस्टवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कंपनीच्या टूथ पेस्टमध्ये मांसाहारी पदार्थ वापरण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणी कंपनीला कायदेशीर नोटीसही पाठविण्यात आली आहे. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी संताप व्यक्त करत योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
‘कोलगेट आमच्या पेस्टमध्ये नमक आहे, असे स्पष्ट सांगून आपले उत्पादन विकते. बाबा रामदेव यांची पतंजली मात्र, आमची टूथपेस्ट शाकाहारी आहे असे सांगून लोकांना फिश बोन (माशांची हाडे) युक्त मांसाहारी टूथपेस्ट विकत आहे’, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.
‘हा रामदेव बाबावर विश्वास ठेवणाऱ्या करोडो लोकांचा विश्वासघात आहे. त्यांनी लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन, शाकाहारी लोकांना मांसाहारी उत्पादने विकली आहेत. पतंजली उत्पादने प्रमोट करणाऱ्या लोकांनी देखील दहावेळा विचार करावा की, आपण आपले खिसे लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडून तर भरत नाही आहोत ना याचा.’ असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.
Issued legal notice to Patanjali, seeking clarifications on the deceptive use of Samudra phen (cuttlefish) in its product Divya Dant Manjan, while labeling it as green. This infringes upon r consumer rights & is deeply offensive to our community and other vegetarian communities. pic.twitter.com/J4JOX7Ninm
— Shasha Jain (@adv_shasha) May 15, 2023
प्रकरण काय ?
दिल्लीतील वकील शाशा जैन यांनी पतंजली कंपनीला नोटीस पाठवली आहे. या नोटीसीबरोबर त्यांनी महत्वाची कागदपत्रे देखील जोडली आहेत. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की दिव्य दंतमंजन शाकाहारी आहे असं म्हटलं गेलं आहे. त्यावर हिरव्या रंगाचे लेबल आहे. असे असताना या दंत मंजनमध्ये Samudra Fen वापरलं आहे. ग्राहकांची ही घोर फसवणूक आहे. लेबल नियमांचे कंपनीने उल्लंघन केल्याचे या नोटीसीत म्हटले आहे. या दंत मंजनात Cuttlefish सारखे मांसाहारी घटक वापरले गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे.