शिरसाटांचा पाय आणखी खोलात ! महिला आयोगाने पोलीस आयुक्तांना धाडले पत्र

शिरसाटांचा पाय आणखी खोलात ! महिला आयोगाने पोलीस आयुक्तांना धाडले पत्र

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबाबतीत केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडताना दिसत आहे. या प्रकरणात आता थेट महिला आयोगाने उडी घेतली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. सदर प्रकरणी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी तसेच या कार्यवाहीचा अहवाल 48 तासांत सादर करावा असे निर्देश आयोगाने दिले आहेत.

आमदार संजय शिरसाट यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सुषमा अंधारे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे जोरदार पडसाद आज दिवसभर उमटत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिरसाट यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.

आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर आंदोलनही केले. त्यानंतर सुषमा अंधारे यांनीही पत्रकार परिषद घेत शिरसाट यांच्याविरुद्ध अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटले. तसेच महिला आयोगाकडेही तक्रार केल्याचे त्यांनी म्हटले होते. या सगळ्या घडामोडींनंतर महिला आयोगही आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

या प्रकरणी महिला आयोगाने छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे, की सुषमा अंधारे यांचा तक्रार अर्ज मिळाला. आमदार शिरसाट यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत आणि माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर अंधारेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.

शिरसाटांविरुद्ध अंधारे मैदानात, अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार !

पत्रात नेमके काय ?

प्रति,
पोलीस आयुक्त,
पोलीस आयुक्त यांचे कार्यालय,
छत्रपती संभाजीनगर
महोदय,

श्रीमती सुषमा दगडुराव अंधारे यांचा तक्रार अर्ज आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. आपल्या सुलभ संदर्भासाठी त्यांनी आयोगाकडे केलेल्या अर्जाची प्रत सोबत जोडली आहे.

आमदार श्री. संजय शिरसाट यांनी दि. २६.०३.२०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आणि माध्यम प्रतिनिधींसमोर अर्जदार यांच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात यावा, असे अर्जदार यांनी नमूद केले आहे.

राजकीय / सामाजिक क्षेत्रातील महिलेचा अवमान करुन त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसुन येत आहे. अर्जदार श्रीमती सुषमा अंधारे या अनेक वर्षापासुन सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत, त्यांच्याबाबत टिका करतांना लोकप्रतिनिधीकडून अश्लाघ्य भाषेचा वापर करणे ही गंभीर बाब आहे. सबब उपरोक्त प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.

तरी सदर प्रकरणी योग्य ती चौकशी करुन कार्यवाही करावी व तसे अर्जदारास कळवावे, तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार आपण केलेल्या कार्यवाहीचा चौकशी अहवाल ४८ तासात आयोग कार्यालयास पाठवावा अशी  मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube