‘मी स्वबळावर राज्याचा तीनदा मुख्यमंत्री’; पवारांनी वळसे पाटलांना दिले इतिहासाचे धडे
Sharad Pawar : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात चांगलाच गदारोळ उठला होता. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलनेही केली होती. त्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनीच वळसे पाटलांचे कान टोचले आहेत.
‘मी स्वळावर तीन वेळा राज्याचा मुख्यमंत्री झालो. तीनदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. आधी पुलोद स्थापन करून मुख्यमंत्री झालो. दुसऱ्या वेळा काँग्रेससह माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या. आम्ही जिंकलो. बहुमत आलं. मी मुख्यमंत्री झालो. त्यामुळे आधीचा राज्याचा इतिहास कुणााला माहिती नसेल तर त्यावर काय भाष्य करणार?’, असा खोचक सवाल पवार यांनी केला.
‘कृषीमंत्री असताना तुम्ही किती मदत केली?’ महाजनांनी पवारांकडे मागितला हिशोब
पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री – सुळे
याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनीही वळसे पाटलांना प्रत्युत्तर दिले होते. सुळे म्हणाल्या, शरद पवार चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून पवार साहेबांनी एकदाही विधानसभा निवडणूक लढली नाही. इंडिया आघाडीतले सगळे लोक आजही पवार साहेबांनाच नेता मानतात. आमचे आमदरही त्यांच्याच नेतृत्वात निवडून येतात. अनेक वेळा आमचा पक्ष राज्यात नंबर एक होता.
काय म्हणाले होते वळसे पाटील ?
शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मु्ख्यमंत्री होता आलं नाही. आपल्याकडे शरद पवारांसारखे उत्तुंग नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. देशात शरद पवार यांच्या उंचीचा कोणताच नेता नाही. पण, महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांन बहुमत दिलं नाही. त्यांना एकदाी स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती यांसारख्या नेत्या स्वबळावर मुख्यमंत्री बनल्या. अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पुढे जात आहेत. आपल्याकडं शरद पवारांसारखे उत्तुंग नेते आहेत. मात्र, आपले फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. नंतर कुणाबरोबर तरी आघाडी करावी लागते, असे वळसे पाटील एका कार्यक्रमात म्हणाले होते.