शरद पवारांचे शिलेदार सोडणार साथ? धीरज शर्मांचा राजीनामा, सोनिया दुहानही तयारीत
Sharad Pawar NCP News : आज रविवारी सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दोन जबर दणके बसले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. तर पक्षातील नेत्या सोनिया दुहान या देखील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. ज्यावेळी राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडी आकार घेत होती तेव्हा सुरू असलेल्या रिसॉर्ट पॉलिटिक्समध्ये या दोन्ही युवा नेत्यांचा सहभाग होता. आता हेच खंदे शिलेदार शरद पवारांची साथ सोडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर दिल्लीत फेरबदल, सोनिया दुहान यांच्याकडे मोठी जबाबदारी
धीरज शर्मा यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. या निर्णयांची माहिती त्यांनी एका फेसबूक पोस्टद्वारे दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की मी धीरज शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मला देण्यात आलेल्या सर्व पदापांसून स्वतःला कार्यमुक्त करत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पक्षाच्या फेसबूक पेजला शरद पवार, सुप्रिया सुळेंना मेन्शन केले आहे. धीरज शर्मा युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष राहिले आहेत.
सन 2019 मध्ये जेव्हा राज्यात महाविकास आघाडी आकार घेत होती. तेव्हा रिसॉर्ट पॉलिटिक्स चांगलेच गाजले होते. या राजकारणात धीरज शर्मा आणि सोनिया दुहान यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. परंतु, आता उत्तर भारतातील हे दोन्ही चेहरे पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. धीरज शर्मा यांनी सध्या पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. परंतु, पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा अजून दिलेला नाही.
सोनिया दुहान अजित पवार गटाच्या वाटेवर
तर दुसरीकडे पक्षातील युवा नेत्या सोनिया दुहान या देखील अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळाली आहे. सोनिया दुहान यांनी पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून काम केले आहे. शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात आल्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय झाल्या होत्या. 2019 मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेतली. त्यावेळी सोनिया दुहान यांनी अजितदादांबरोबर गेलेल्या आमदारांना हॉटेलमधून बाहेर काढण्याच्या कामात प्रयत्न केले होते.
‘लोकसभेला कमी जागा घेतल्या पण, विधानसभेला जमणार नाही’; शरद पवारांचा मित्रपक्षांना इशारा