ऊस गाळपाबाबत सरकारचा मोठा निर्णय; साखर कारखान्यांसाठी काय बदललं?

Sugarcane crushing season : महाराष्ट्रातील 2026-27 च्या ऊस गाळप हंगामाविषयी कारखान्यांबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 28T182323.287

महाराष्ट्रातील 2026-27 चा (Sugarcane) ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. मात्र, गाळप परवान्यासाठी आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केलेल्या साखर कारखान्यांना त्यापूर्वीच गाळप सुरू करता येणार आहे. सहकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या साखर कारखान्यांना हा निर्णय लागू राहणार असून, हंगाम सुरू करण्यासाठी संबंधित कारखान्यांकडं आवश्यक परवाना असणं बंधनकारक राहणार आहे.

9 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीतील सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 15 ऑक्टोबरपूर्वी गाळप परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या आणि सर्व आवश्यक पूर्तता केलेल्या कारखान्यांना परवाना देण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे परवानगीची प्रक्रिया पूर्ण झालेल्या कारखान्यांना निर्धारित तारखेची वाट पाहण्याची गरज राहणार नाही आणि ते त्यापूर्वीही गाळप सुरू करू शकतील.

ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय

दरम्यान, कोणत्याही साखर कारखान्यानं 15 ऑक्टोबरपूर्वीच गाळप सुरू करावं, अशी शासनाकडून सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र, गाळप सुरू करण्याआधी साखर आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून अधिकृत गाळप परवाना घेणं प्रत्येक कारखान्यासाठी आवश्यक आहे. परवाना न घेता गाळप सुरू करता येणार नसल्याचंही साखर आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

2026-27 चा गाळप हंगाम सुरळीत पार पडण्यासाठी राज्यातील साखर कारखाने आणि संबंधित घटकांनी शासनाच्या तसेच साखर आयुक्त कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. गाळप परवाना, प्रशासकीय पूर्तता आणि इतर आवश्यक बाबी पूर्ण करूनच कारखान्यांनी हंगाम सुरू करावा, अशी भूमिका साखर आयुक्त कार्यालयानं घेतली आहे.

follow us