आज ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस; नागपूरपासून नांदेडपर्यंत ‘अलर्ट’ जारी
Maharashtra Weather Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे.
Maharashtra Weather Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर आता पुन्हा एकदा राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आज होणाऱ्या अवकाळी पावसासाठी हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करत नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले आहे.
मराठवाडा आणि विदर्भासाठी ‘यलो अलर्ट’
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवार (5 एप्रिल) रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी, तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची आणि विजा पडण्याचा धोका असल्याचे वर्तवण्यात आले आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे, राज्याभरातील कमाल तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे मात्र, किमान तापमानात वाढ झाल्यामुळे रात्रीच्या वेळी होणारा उकाडा आणि अस्वस्थता वाढली आहे.
शनिवारी, राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अमरावती येथे 39.8°C नोंदवले गेले, तर अकोल्यामध्ये पारा 39.10 C वर होता. याउलट, सर्वात कमी किमान तापमान निफाड येथे 15°C नोंदवले गेले.
हवामान विभागाने असा अंदाज वर्तवला आहे की, महाराष्ट्र आणि गुजरात विभागांतील कमाल तापमान पुढील चार दिवस स्थिर राहील त्यानंतर मात्र तापमानात हळूहळू 2 ते 3 अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी विशेष खबरदारी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. गारपिटीपासून आपली पिके आणि फळबागांचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक जाळ्या किंवा आच्छादनांचा वापर करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार?
ज्यांची पिके काढणीसाठी तयार आहेत, त्यांना ती लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी साठवण्याचे किंवा ताडपत्रीने झाकून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, पशुपालकांना असा सल्ला देण्यात आला आहे की, सोसाट्याचा वारा आणि विजा चमकत असताना, जनावरांना मोकळ्या जागेत न बांधता, सुरक्षित निवाऱ्यामध्ये ठेवावे.