बीड पोलीस विभागात मोठी उलथा-पालथ; तब्बल १७ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Beed Police Administration : बीड जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या जिल्हा पोलीस दलात आज शनिवारी (ता. ३१) मोठे फेरबदल करण्यात आले. जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस निरीक्षक, नऊ सहाय्यक पोलीस (Police) निरीक्षक व पाच पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्याचबरोबर, बाहेर जिल्ह्यातून आलेल्या दोन निरीक्षकांनाही पोलीस ठाण्यांची जबाबदारी देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांची नेमणूकही शनिवारी पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी केली. शिवाजी बंटेवाड यांना ही जबाबदारी देण्यात आली.
शिवाजी बंटेवाड हे बीड ग्रामीण पेालीस ठाण्यात कार्यरत होते. ११ महिन्यांपूर्वी परळीहून उस्मान शेख यांची स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी विनंती बदलीची मागणी केली होती. त्यांची सरत्या आठवड्यात लातूरला बदली झाली.
पोलीस निरीक्षक संवर्गामध्ये शिवाजी नगर ठाण्याचे मारुती खेडकर यांची बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तर त्यांच्या जागी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून आलेले किशोरसिंग पवार यांना जबाबदारी देण्यात आली. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे विनोद घोळवे यांची सायबर पोलीस ठाण्यात बदली झाली. तर, त्यांच्या जागी संभाजीनगरहून आलेले शरद जोगदंड यांना नेमणूक देण्यात आली. अनैतिक मानवी प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्होगाडे यांना वडवणी पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली. याच संवर्गातील गणेश धोक्रट यांची शिरुर कासारहून जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली.
भाजपाच्या संघटनात्मक निवडींमध्ये जिल्हाध्यक्षांची दुसरी यादी जाहीर; बीड, नगर, संभाजीनगरमध्ये कोण?
राजेंद्र घुगे यांची अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तर गेवराईहून संतोष जंजाळ यांची पाटोदा पोलीस ठाण्यात आणि आर्थिक गुन्हे शाखेतील रत्नाकर घोळवे यांची एटीबीला बदली करण्यात आली. आरसीपीला असलेले महादेव ढाकणे यांना दिंद्रूड तर अंबाजोगाई शहरला असलेले मनोज निलंगेकर यांना तलवाडा आणि परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यातील प्रविण जाधव यांना शिरुर कासार पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली.
परळी ग्रामीण पोलीस ठाण्यातील अनमोल केदार यांची पोलिस अधीक्षकांचे वाचक म्हणून बदली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील भारत बर्डे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात तर शफिक सय्यद यांची पोलीस अधीक्षकांच्या वाचक शाखेतून बीड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे वाचक पदावर बदली करण्यात आली.
डिएसबीमधील दादासाहेब केदार यांना कायम ठेवले असून आनंद शिंदे यांची केजहून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अदिनाथ भडके यांची पाटोदाहून अंभोरा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. सेवाजेष्ठता, अधिकाऱ्यांचे कामांचे मुल्यांकन, गृहविभागाच्या विविध नियमांनुसार बदल्यांचे आदेश काढण्यात आले. क्षमता असलेल्यांना पोलीस ठाण्यांची जबाबदारी देण्यात आली.