Beed Attack : नायब तहसीलदारांवर पेट्रोल हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न
बीड : केज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदावर असणाऱ्या आशा वाघ (Asha Wagh) यांच्यावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
आशा वाघ या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या असून त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्या केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.
याबाबत आधिक माहिती अशी की, आशा वाघ या शुक्रवारी दुपारच्या सुमारास दुचाकीवरुन तहसील कार्यालयाकडे जात असताना एका चारचाकी वाहनाने त्यांना अडवले. या वाहनामधील एका महिलेसह अन्य चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला.
पाच जणांनी बाटलीतून आणलेले पेट्रोल त्यांच्या अंगावर टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या आहेत. विशेष बाब म्हणजे यापूर्वी आशा वाघ यांच्या भावानेच त्यांच्यावर तहसील कार्यालयात प्राणघातक हल्ला केला होता.
याच प्रकरणात सध्या आशा वाघ यांचा भाऊ कोठडीत आहे. दरम्यान याचीच तक्रार मागे घे असं म्हणत आशा वाघ यांच्या भावाच्या मेहुण्याने त्यांच्यावर प्राणघाती हल्ला केला आहे.
एका महिलेसह इतर चार अज्ञात आरोपींनी त्यांवर प्राणघातक हल्ला केला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.