बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग, प्रशासनाचं स्पष्टीकरण; रोहित पवारांच्या ट्विटने ट्विस्ट!
Rohit Pawar on Beed Case : मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या वाल्मीक कराडने पु्ण्यात सीआयडी समोर आत्मसमर्पण केलं. यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सु्नावली. काल कोठडीतील पहिल्याच दिवशी वाल्मीक कराडची प्रकृती बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर आता आणखी एक बातमी राजकारणात चर्चेची होत आहे. कराड सध्या केजमध्ये सीआयडीच्या कोठडीत आहे. तो ज्या कोठडीत आहे त्याठिकाण पोलीस ठाण्याबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे.
#बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.
नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 1, 2025
रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट केली आहे. यात म्हटले आहे की बीड पोलीस ठाण्यात नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत. स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले असे अनेक प्रश्न आहेत. नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभराती सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी उशी पंखा एसी देखील बसवता येतील का याचाही विचार करायला हवा असे आमदार रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी हे पलंग कोठडीतील आरोपींसाठी तर आणले नाहीत ना असा संशय व्यक्त केल्याची चर्चा आहे. यानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील पोलीस ठाण्यात पलंग का मागवण्यात आले असा सवाल उपस्थित केला. तसेच एसआयटी चौकशीचा केवळ फार्स ठरू नये अशी अपेक्षाही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
कराडची चौकशी करायची की सेवा : वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या मुद्द्यावर एक ट्विट केलं आहे. महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मीक कराड येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का? वाल्मीक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटातही नसतात. आरोपीचे लाड पुवण्याची ही सुरुवात आहे. हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण सगळच मिळेल!
वाल्मीक कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराडवर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी. कराडवर अजूनही संतोष देशमुख हत्या असो की मकोका अंतर्गत गुन्हाही दाखल झालेला नाही, त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असे वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.