धस, सोळंकेंना धक्का, प्रशासनाला दम… अजितदादांनी कसं लावलं ‘बीड’चं नियोजन?
“आपल्याकडून कोणती कामं मंजूर झाली कर ती कामं दर्जेदारच असली पाहिजेत. त्यात काहीही वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही, हा जनतेचा पैसा आहे तिथं कोणतीही गडबड होता कामा नये. शिवाय विकासकामं करत असताना खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा माझ्या कानावर आल्यास मोक्का लावायलाही मी मागेपुढे पाहणार नाही, कोणतीही टोकाची भूमिका घेईन”, असा दम देत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत ‘जिल्ह्याचे नियोजन’ लावले. त्याचवेळी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना नडलेल्या भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनाही धक्का दिला. शिवाय नियोजन समितीवर मुंडे यांचाच होल्ड राहील याचीही काळजी घेतली. (Beed District Planning Committee meeting held in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar)
अजित पवार यांची पालकमंत्री म्हणून बीडची पहिली बैठक कशी झाली? जिल्ह्याचे नियोजन कसे लावले? पाहुया या
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्र स्थानी आहे. अशातच पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक नियोजित होती.
या बैठकीपूर्वी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तुम्ही सर्वच माझ्या जवळचे आहात. पण पक्षात चुकीचं काम करणाऱ्या लोकांना ठेवणार नाही असं म्हणत सज्जड दमच दिला. बीड जिल्ह्यात कारखान्यांच्या व्यवस्थापकाला खंडणी मागितली जाते. हे योग्य नाही. विकासकामात कुणी खंडणी मागितली तर मी त्याच्यावर कारवाई करेन. चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे मी उभा राहणार नाही. काम करणाऱ्यांच्या मागे मी उभा राहीन, चुकीची कामं केल्यानं पक्षाचे नाव खराब होते. त्यामुळे पक्षात राहायचं असेल तर चांगलं काम करा, असे त्यांनी बजावून सांगितले.
कमरेला कट्टे लावून फिरणारे, हवेत गोळीबार करणारे, धमकावणारे बीडचे अनेक भाईगिरी करणारे राजकीय कार्यकर्ते राज्याने पाहिले. मी बघतो, कोणी रिव्हॉल्वर काढतं, वर रिव्हॉल्वर उडवतात. कुणी लावून फिरतं. पण जे कोणी रिव्हॉल्वर लावून फिरेल त्यांचा परवाना रद्द करण्याचे निर्देश आपण अधिकाऱ्यांना दिले आहेत. रिव्हॉल्वर स्वसंरक्षणासाठी असून, तुमचे हे रिल वगैरे बनतात ते मी खपवून घेणार नाही. मी सर्वांना सारखा नियम लावणार आहे. कोणावर निशाणा साधायचा नाही, पण बदल झालाच पाहिजे, असा दमही अजितदादांनी भरला.
Video : धसांकडून मोहीम फत्ते; जरांगेंची उपोषण स्थगितीची घोषणा; पण, आता लढाई समोरा-समोर…
या बैठकीनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. बैठकीला मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. सुरुवातीला बैठक वादळी होईल अशी शक्यता होती. मात्र अजित पवार यांनी पहिल्या मिनिटांपासूनच आमदार आणि अधिकाऱ्यांवर आपला वचक राखला. सुरुवातीला नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. आधी सुरेश धस आणि प्रकाश सोळंके या ज्येष्ठ आमदारांच्या नावांची चर्चा होती. पण अजित पवार यांनी या दोघांनाही धक्का देत गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि केजच्या आमदार नमिता मुंदडा या दोघांना नामनिर्देशित सदस्य म्हणून जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती केली.
धस आणि सोळंके यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान उठवलं आहे. त्यापार्श्वभूमीवर या निर्णयाकडे पाहिले जात आहे. विजयसिंह पंडीत हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय तर नमिता मुंदडा या मंत्री पंकजा मुंडे यांच्या विश्वासू समजल्या जातात. काहीच दिवसांपूर्वी आमदार पंडीत यांनी संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांची बाजू घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी चुकीची असल्याचे म्हंटले होते.
78 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या तक्रारीने पाचशे जण कोमात; सुरेश धसांचा पेनड्राइव्ह ‘बॉम्ब’ अन् लेखी तक्रारही करणार
बैठकीमध्ये, मंत्री धनंजय मुंडे, खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार सुरेश धस यांच्यात बीड जिल्ह्याची बदनामी आणि दहशत यावरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर सर्व विभागांचा, विविध विकासकामांचा आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. तसंच आपल्याकडून कोणती कामं मंजूर झाली कर ती कामं दर्जेदार असली पाहिजेत. त्यात काहीही वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही, हा जनतेचा पैसा आहे तिथं कोणतीही गडबड होता कामा नये, असा दमही अधिकाऱ्यांना दिला. यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी उत्तर-दक्षिण विभागाला जोडण्यासाठीच्या रेल्वेचा प्रस्वाव मांडला. तसंच विमानतळही व्हावे अशी मागणी केली. त्यासाठी बाजार समितीची जागा प्रस्तावित केली.
थोडक्यात अजित पवार यांनी संपूर्ण दौरा हा बीड जिल्ह्याची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यावरच खर्ची घातला.