दिवाळीच्या तोंडावर बीडमध्ये अन्न प्रशासनाची धडक कारवाई, खवा-माव्यासह मसाल्यांचा साठा जप्त
Beed Food Safety Action : दिवाळीच्या तोंडावर बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठा मालही तप्त केला.
Beed Food Safety Action : दिवाळीच्या काळात मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने बीड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम तीव्र केली आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, यासाठी करण्यात आलेल्या तपासणीत (Beed ) अनेक ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले. या कारवाईत तीन अन्न व्यवसायांचे परवाने रद्द किंवा निलंबित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून, खवा आणि माव्यासह मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार 23 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील विविध खाद्यपदार्थ विक्री आणि उत्पादन केंद्रांची तपासणी करण्यात आली. या वेळी काही ठिकाणी अस्वच्छता, खाद्यपदार्थांची अयोग्य साठवणूक, कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव आणि आवश्यक नोंदी व प्रमाणपत्रे नसल्याचे समोर आले. अन्न सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
धुळे-सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा येथील मे. मामा काठियावाडी हॉटेलच्या तपासणीत त्रुटी आढळल्याने त्याचा अन्न परवाना 23 ऑक्टोबरपासून तात्काळ निलंबित करण्यात आला. याशिवाय जिल्ह्यातील इतर अन्न व्यवसायांचीही तपासणी करण्यात आली. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांचे पालन होत नसल्याचे आढळलेल्या व्यवसायांवर प्रशासनाने कारवाई केली. मात्र, तीन ठिकाणचे परवाने रद्द करण्यात आल्याचा उल्लेख असतानाच एका हॉटेलचा परवाना निलंबित केल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
बीडच्या हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा; चौथी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?
दिवाळीत मिठाई तयार करण्यासाठी खव्याची मागणी वाढत असल्याने प्रशासनाने खवा विक्री केंद्रांवरही लक्ष केंद्रित केले. बीडमधील बालाजी खवा विक्री केंद्रातून 70 किलो खवा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे 19 हजार 600 रुपये आहे. ताडसोन्ना परिसरातील दुसर्या खवा विक्री केंद्रावर परवाना नसताना व्यवसाय सुरू असल्याचे आढळले. या ठिकाणाहून 24 किलो खवा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत अंदाजे 6 हजार 720 रुपये असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
बीड शहरातील मे. गोरे बंधू मसाले येथे तपासणीदरम्यान रेड चिली पावडरचा 298 किलो साठा आढळून आला. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याने हा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे 14 हजार 900 रुपये आहे. जप्त केलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर संबंधित उत्पादक आणि विक्रेत्यांविरुद्ध कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
अन्न व्यवसाय चालवणार्यांनी परिसरात स्वच्छता राखणे, खाद्यपदार्थ योग्य तापमानात साठवणे, आवश्यक परवाने आणि नोंदी ठेवणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दिवाळीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये, यासाठी विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, तसेच संशयास्पद किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकले जात असल्याचे आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.