गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला; पुन्हा सुपाऱ्याही फेकल्या
जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह अजून काही पदाधिकाऱ्यांकडून ही शाई फेक करण्यात आली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात (Jalna) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाई आणि सुपारी फेक केली आहे. ज्या गाडीवर शाई आणि सुपारी फेकल्या त्या गाडीत गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी होती. जालना शहरातल्या विशाल कॉर्नर परिसरात ही घटना घडली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह अजून काही पदाधिकाऱ्यांकडून ही शाई फेक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुंबईतील रिक्षा चालकांच्या संदर्भात मराठी अमराठी यावादावर गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यवार टीका केल्यानंतर जालन्यात मनसैनिक आक्रमक झाले होते. चंदनझिरा पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
दरम्यान गुणरत्न सदावर्ते हे सातत्याने मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावर मनसेनं घेतलेल्या भूमिकेवर देखील त्यांनी चांगलीच टीका केली होती. त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केलं होता.
यापूर्वी देखील गुणरत्न सदावर्ते यांनी अनेकदा मनसेवर टीका केली आहे. त्यानंतर आता मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सदावर्ते यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली आहे. दरम्यान, मनसेकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेमुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. या घटनेवर अद्याप सदावर्ते यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.