80 तोळ्याचे दागिने लंपास; SBI बँक अधिकाऱ्यांचा कारनामा, शेअर मार्केटने केला घात
या प्रकरणातील मुख्य आरोपी आदित्य सेनगावकर हा प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच फरार झाल्याची माहिती आहे.
कर्जासाठी बँकेत तारण ठेवलेल्या ग्राहकांच्या (Gold) 80 तोळे सोन्यावर बँकेच्या कॅश मॅनेजर आणि सर्व्हिस मॅनेजरने डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार नांदेड शहरातील एसबीआय बँकेत समोर आला आहे. बँकेच्या ऑडिट दरम्यान हा अपहार उघडकीस आल्यानंतर वजीराबाद पोलीस ठाण्यात दोन अधिकाऱ्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती आहे.
या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे अधिकाऱ्यांनी चोरी केलेलं सोनं शहरातील वेगवेगळ्या बँकेत ठेवून लाखो रुपयांचं कर्ज घेतलं आणि ते पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले. शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्यानं अधिकाऱ्यांनी शक्कल लढवत खोटं सोनं लॉकरमध्ये ठेवल्याची माहिती आहे. या अपहार प्रकरणानं खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
शहरातील डॉक्टर लेन परिसरात एसबीआय बँकेची शाखा असून जीवन जगदाळे हे सर्व्हिस मॅनेजर आणि आदित्य सेनगावकर हे कॅश मॅनेजरपदी कार्यरत आहेत. शेकडो ग्राहकांनी सोनं तारण ठेवून कर्ज घेतलं होतं. याचदरम्यान मागील एक वर्षात जगदाळे आणि सेनगावकर यांनी आपल्या पदाचा फायदा घेत आणि पैशांच्या लालचेत येऊन बँकेत ठेवलेलं तब्बल 80 तोळे सोनं काढून घेतलं. काही सोनं विकलं तर काही सोनं इतर बँकेत तारण ठेवून लाखो रुपयाचं कर्ज घेतलं आणि आलेला पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला.
पती बेपत्ता असल्याची तक्रार
धक्कादायक म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी आदित्य सेनगावकर हा प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच फरार झाल्याची माहिती आहे. आरोपीच्या पत्नीने काही दिवसापूर्वी वजीराबाद पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल केल्याची माहिती आहे. फसवणूकीचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी जीवन जगदाळे याला ताब्यात घेतलं आहे. आज रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयानं आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आणखी कोणाचा समावेश आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.