वैद्यनाथ साखर कारखान्यावर GST ची वक्रदृष्टी, संकटसमयी बहिणीच्या मदतीला धावून जाणार धनुभाऊ
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला (Vaidyanath Sugar Factory) जीएसटी (GST) विभागाने जप्तीची नोटीस पाठवली आहे. कारखान्याने सुमारे 19 कोटी रुपयांचा जीएसटी कर भरला नसल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे, ही केवळ नोटीस नसून जीएसटी विभागाची कारवाईच आहे, असं खुद्द पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भाजपसोबतच सत्तेत मंत्री असलेले त्यांचे बंधू धनंजय मुंडेंनी (Dhananjaya Munde) पंकजा मुंडेंना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोलल्या जातं.
केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने सहा महिन्यांपूर्वी वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर छापा टाकून कागदपत्रांची तपासणी केली होती. तेव्हा कारखान्याने 19 कोटींचा जीएसटी चुकविल्याचे समोर आले होतं. यानंतर दोन दिवसांपूर्वी जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. दरम्यान, याबाबत बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की, अडचणीच्या काळात केंद्र सरकारकडून आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही. इतर सर्व साखर कारखान्यांना मदत मिळाली. पंकजा यांनी नाराजी व्यक्त करताना केवळ आपल्या कारखान्यांना मदत मिळाली नसल्याचे सांगितले. आता त्यांचे बंधू मंत्री धनंजय मुंडे पंकजा यांना मदत कररण्यासाठी धावून जाणार आहेत.
Oscars 2024: भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘या’ सिनेमाची घोषणा
खरंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात राजकीय वैर आहे. 2014 मध्ये पंकजा मुंडे यांनी परळीतून धनंजय मुंडे यांचा पराभव केला होता. तर 2019 मध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजांचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यानंतर भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. आता ते संकटसमयी बहिणीच्या मदतीला जाणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे यांचा कारखाना वाचवण्यासाठी भावाने कंबर कसली आहे. कारखाना वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे मार्गदर्शन करणार आहेत. कारखान्याकडून सरकारला प्रस्ताव पाठवण्याबाबत सांगण्यात येणार आहे. या विषयावर स्वतः धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करणार आहेत.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रशासकीय पातळीवर कारखान्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत धनंजय मुंडे कारखान्याचे अधिकारी आणि पंकजा मुंडे यांना मार्गदर्शन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंकजा मुंडे यांच्याशी आज किंवा उद्या या विषयावर स्वत: धनंजय मुंडे चर्चा करणार आहेत. धनंजय मुंडे हे देखील काही काळापासून वैद्यनाथ साखर कारखान्याशीही जोडले गेले आहेत. त्यामुळे हा कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न करणं, याला त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनापेक्षा भावनिक कारण अधिक आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मदतीला धनंजय मुंडे धावणार आहेत.
पंकजा मुंडे यांना या कारखान्याबाबत काही पदाधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती दिली जात असेल तर त्याबाबत योग्य माहिती दिली जाणार आहे. राज्य सरकार म्हणून काय केलं जायला पाहिजे, याबाबत धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, राजकीयदृष्ट्या दुरावलेले बहिण-भाऊ पुन्हा एकत्र येणार का? हेच पाहणं महत्वाचं आहे.