मुलीच्या प्रेमप्रकरणात आईचा राग अनावर, भरदिवसा ‘बॉयफ्रेंड’ टाकला गाडीत अन्…

या अपहरणामागे जुन्या वादाचा बदला असल्याचं तपासात उघड झालं आहे. सुमारे एक वर्षापूर्वी विशाल आणि संबंधित तरुणी घरातून पळून गेले होते.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 14T164233.847

छत्रपती संभाजीनगरमधील सिडको बसस्थानक परिसरात (Crime) दिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली. प्रेमसंबंधातून वाद निर्माण झाल्याने एका 23 वर्षीय तरुणाचे भररस्त्यातून फिल्मीस्टाइल अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एका कारमधून येत महिलेसह काही अनोळखी व्यक्तींनी तरुणाला जबर मारहाण करत जबरदस्तीने गाडीत कोंबून नेल्याचा प्रकार उघड झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. अपहरण झालेल्या तरुणाचं नाव विशाल आबासाहेब येडके (वय 23, रा. मिसारवाडी) असं असून तो सिडको बसस्थानकासमोरील एका नाष्टा सेंटरवर काम करतो. विशालचे आरोपी महिलेच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. सुरेश नरवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेसह 10 ते 12 जणांनी विशालला मारहाण केली आणि त्याला गाडीत बसवून पळ काढला.

पुणे-संभाजीनगर फक्त 2 तासात पार होणार; नितीन गडकरींकडून मोठी घोषणा

अपहरणानंतर आरोपींनी विशालला कारमधून सातारा परिसरात नेलं. प्रवासादरम्यान तसंच तेथे पोहोचल्यानंतर आणखी काही जणांना बोलावून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचं विशालने पोलिसांकडं दिलेल्या जबाबात नमूद केलं आहे. मारहाणीनंतर आरोपींनी त्याला सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखाली सोडून दिलं. त्यानंतर विशालने आपल्या मामाला फोन करून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. मामा नरवडे यांनी त्याला तात्काळ पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली.

या अपहरणामागे जुन्या वादाचा बदला असल्याचं तपासात उघड झालं आहे. सुमारे एक वर्षापूर्वी विशाल आणि संबंधित तरुणी घरातून पळून गेले होते. त्या वेळी मध्यस्थी करून दोघांना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं होतं आणि तरुणीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आलं होतं. मात्र, या घटनेनंतरही आरोपींच्या मनात राग कायम राहिल्याने सूडाच्या भावनेतून हे अपहरण करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, इतर आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Tags

follow us