‘अजित पवार अर्थमंत्री, आता उद्धव ठाकरेंकडे परत जा’; काँग्रेस नेत्याचा शिंदे गटाला खोचक सल्ला
Ashok Chavan : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. खातेवाटपातही अजितदादांनी आपली पॉवर दाखवत मनासारखी खाती पदरात पाडून घेतली. शिंदे गटाचे आमदार वर्षभरापासून प्रतिक्षेत असताना त्यांचा कोणताही विचार केला गेला नाही. या राजकारणावर आता विरोधी पक्षांनी शिंदे गटाला डिवचण्याचे काम सुरू केले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शिंदे गटातील आमदारांना एक सल्ला दिला आहे. शिंदे गटातील 40 आमदारांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत यायला हरकत नाही, असा खोचक सल्ला दिला आहे. नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
वित्त विभाग दादांकडे असल्याने आमच्यावर अन्याय झाला, अशी सबब सांगून काही आमदार उद्धवजींना सोडून गेले. पण ज्या दादांमुळे ते सोडून गेले, तेच दादा आज पुन्हा राज्याचे अर्थ मंत्री झाले आहेत. त्यामुळे या मंडळींनी आता परत यायला हरकत नाही. त्यासाठी त्यांना हे कारण पुरेसं आहे. पण त्यांना… pic.twitter.com/wejhyDmKLU
— Ashok Chavan (@AshokChavan1958) July 15, 2023
ते म्हणाले, अजित पवारांकडे असलेल्या अर्थखात्यामुळे आमच्यावर अन्याय झाल्याचं शिंदे गटातील आमदारांनी सांगितलं होत. त्यामुळे आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले होते. जे आमदार अजित पवार यांच्यामुळे सोडून गेले तेच अजित पवार आता पुन्हा अर्थमंत्री झाले आहेत. त्यामुळे आमदारांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्यास हरकत नाही.
राजकारण म्हणजे आयपीएल
ते पुढे म्हणाले, राजकारण आयपीएल सामन्यासारखं झालं आहे. आयपीएलप्रमाणे बोली सुरू आहे. अपात्रतेच्या कायद्याची पायमल्ली होत आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख सुरू आहे. आता कुणी भेटल्यावरही तो माणूस विचार करतो की समोरील व्यक्ती कोणत्या पक्षात किंवा गटात आहे. रोज करमणूक होत आहे, असे चव्हाण म्हणाले.
विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच – पटोले
अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळेल असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकले. राष्ट्रवादी मंत्रिमंडळात आहे. नऊ आमदारांनी शपथ घेतली आहे. आता राष्ट्रवादीकडे 44 आमदार तर काँग्रेसकडे 45 आमदार आहेत. आमचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे आम्हालाच विरोधी पक्षनेते पद मिळेल असा दावा पटोले यांनी केला. विधिमंडळाचे अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होत आहे. सध्या काँग्रसचे आमदार संख्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त आहे. त्यामुळे विधिमंडळात काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता असेल असे पटोले यांनी सांगितले.