मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावच लागेल; त्याशिवाय मराठा समाज…; जरांगे आक्रमक

  • Written By: Published:
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावच लागेल; त्याशिवाय मराठा समाज…; जरांगे आक्रमक

Manoj Jarange Patil On Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 16 दिवस बेमुदत उपोषण केलं. अखेर सरकारनं नमतं घेत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला. मात्र, सरसकट आरक्षण द्या, ही जरांगेंची मागणी आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र, जरांगेंनी शासनाकडे केलेल्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. अशातच जरागेंनी आक्रमक भूमिका घेतली. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र हे सरकारला द्यावंचं लागेल. त्याशिवाय, मराठा शांत बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका जरांगेंनी घेतली.

सरसकट आरक्षण देण्याच्या जरांगेच्या मागणीला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. त्यामुळं सरकारची कोंडी होत आहे. यावर आज माध्यमांशी बोलतांना जरांगे म्हणाले की, मराठा समाज हा आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र हे सरकारला द्यावेच लागेल. सरकार मराठा आरक्षण द्यायच्या ऐवजी नाटकं करत आहे. सरकारने नाटकं न करता नोंदी मागण्याची अट सोडून समाजाला सरसकट आरक्षण द्यावे. तसेच या अगोदर ज्या ज्या समाजाला आरक्षण देण्यात आले आहे, त्यामध्ये कुठल्या समाजाच्या नोंदी यापूर्वी सरकारने घेतल्यात, तेही सरकारने स्पष्ट करावे, असं जरांगे पाटील म्हणाले.

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये वरिष्ठ उपसचिव पदासाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार २० हजारांहून अधिक पगार, कोण करू शकतो अर्ज? 

ते म्हणाले, आम्ही सरकारला 14 तारखेपर्यंत कुठलाच डिस्टर्ब करणार नाही. 14 तारखेच्या नंतर राज्यभरात समाज आपापल्यापरीने काय करायचे ते करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

सरकारने मराठा समाजाकडून 40 दिवसाचा वेळ हा स्वतःहून मागून घेतलेला आहे. हा वेळ आम्ही सरकारला दिलेला नाही. सरकारने योग्य तो निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मराठा प्रवर्ग करून 50 टक्क्याच्या आत जर सरकार आरक्षण देत असेल तर ते आम्ही घ्यायला तयार आहे. 50% च्या वर मराठा प्रवर्ग तयार करून जर आरक्षण देत असेल तेथे खोटं आरक्षण घ्यायला आम्ही तयार नाही, हे देखील जरांगेंनी स्पष्ट केलं.

मराठी समाजाला ओबीसीतून जातप्रमाणपत्र दिलं जावं, ही जरांगेंची मागणी संविधानिक नाही, मराठा समाजाला आरक्षण द्यावं, मात्र ते देतांना त्यांच्यासाठी वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्यावं, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं. यावरही जरांगेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, 14 तारखेला आम्ही सुद्धा कडाडून सांगणार आहोत की मराठा काय आहे. मराठ्यांच्या भावना सरकारला समजून घ्याव्याच लागतील. वडेट्टीवार यांनी यानंतर बोलताना थोडा विचार विनिमय करून बोलायला पाहिजे, असं ते म्हणाले.

ते म्हणाले, मराठा समाज हा प्रत्येक पक्षाच्या पाठीशी राहिला आहे व प्रत्येक पक्षाला मराठा समाजाने मोठा केलेला आहे. 75 वर्षात मराठ्यांनी सर्वांना मोठे केले आहे, त्यांनी आता आमचे उपकार फेडण्याची वेळ आली आहे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन योग्य तो विचार करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, असं जरागेंनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube