‘सरकारला आपली मागणी मान्य करावीच लागेल’; शाहू महाराज छत्रपतींनी घेतली जरांगेंची भेट
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज शाहू महाराज छत्रपती यांनी आंतरवाली सराटी येथे येत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी त्यांनी सरकारला आपली मागणी मान्य करावीच लागेल असे स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच मनोज जरांगे यांनीही कोणत्याही परिस्थितीत अर्धवट आरक्षण घेणार नाही, असे स्पष्ट केले. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सुद्धा योग्य आहे. सरकारला तुमची मागणी मान्य करावीच लागेल, असे शाहू महाराज छत्रपती यांनी जरांगे यांना उद्देशून सांगितले. यावेळी जरांगे पाटील यांनीही शाहू महाराजांचा मान राखत दोन दिवस पाणी पिणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Maratha Protest : आंदोलनाचे लोण पुण्यापर्यंत, नवले पुलावर जाळपोळ; वाहतूक विस्कळीत
कुणीही आत्महत्या करू नका
मनोज जरांगेंच्या पाठिशी उभे राहा. दुफळी होऊ देऊ नका. आपला उद्देश आपण साध्य करू. जाळपोळ नेमकी कुणी केली हे अजून मला काही माहिती नाही. तरीपण आपण शांततेच्या मार्गानेच आंदोलन केले पाहिजे. जेणेकरून मराठा समाजावर अन्याय आणि कोणताही ठपका पडणार नाही. आत्महत्या करून फारसं काही मिळणार नाही परंतु ते जर राहिले तर आधिक जोमाने काम करू शकतात. कुणीही आत्महत्या करू नये. आपली ध्येय धोरणे लक्षात ठेऊन त्यानुसार आपण कामकाज करता येईल. आज राज्य सरकारची बैठक होत आहे. या बैठकीत काय होईल हे माहिती नाही परंतु, आपल्या मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा करू नये. मनोज जरांगे पाटलांना असेच सहकार्य करा, असे आवाहन शाहू महाराज छत्रपती यांनी केले.
धाराशिवमध्ये संचारबंदी लागू
बीडपाठोपाठ धाराशिवमध्येही आंदोलन चिघळले होते. एसटी बसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या वाहनावर हल्ले, लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना वाढल्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी खासगी मालमत्तेचेही नुकसान करण्यात आले. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा विचार करता जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले.
शिंदे समितीने शोधल्या 11 हजार 530 जुन्या कुणबी नोंदी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल उपसमितीची बैठक घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे समितीच्या कामकाजाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीने जवळपास 1 कोटी 72 लाख कागदपत्रांची तपासणी केली आहे. या समितीने आतापर्यंत 11 हजार 530 जुन्या कुणबी नोंदी शोधून काढल्या आहेत. या समितीचा हा प्राथमिक अहवाल उद्या (31 ऑक्टोबर) कॅबिनेटमध्ये मांडण्यात येणार आहे. त्यानंतर महसूल मंत्री सर्व कागदपत्रांची तपासणी करतील आणि पुढील कार्यवाही करतील, असेही त्यांनी सांगितले.