आणखी दहा दिवस देतो, नंतर मात्र.. जरांगेंनी सांगितलं पुढं काय करणार?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मागील 17 दिवसांपासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले. आता आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याबाबत जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः लक्ष घालणार आहेत. मी आधीपासूनच सांगत होतो की मराठा समाजाला न्याय देतील ते फक्त एकनाथ शिंदेच आहेत. तीच भूमिका एकनाथ शिंदे यांची आहे. सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला होता. याआधी मी समाजाला विश्वासात घेतलं. बैठका घेतल्या. सरकारला एक महिन्याचा वेळ द्यायचा का?, तोपर्यंत उपोषण मागे घ्यायचे का?, हे प्रश्न मी सगळ्यांना विचारले त्यानंतरच हा निर्णय घेतला.
हवे तर आणखी दहा दिवस देतो, नंतर मात्र..
सरकारला मोठ्या मनाने वेळ दिला. समाजाच्या वतीने आणखी दहा दिवस देतो फक्त आरक्षण (Maratha Reservation) द्या. जीव गेला तरी चालेल पण तुमच्या पदरात आरक्षणच टाकील. माझ्या बापाच्या कष्टाचं खाऊन समाजाचं काम करतो. मी तुमच्या प्रश्नावर एक इंचही मागे हटणार नाही. मी शिंदेंना येथे आणूनच दाखवलं. तुम्ही कसलीही काळजी करू नका. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. शिंदे साहेबांच्या मागेच लागणार आहे. त्यांनाही माहिती आहे. कारण, एकनाथ शिंदे हेच आपल्याला आरक्षण देऊ शकतात अशी माझी खात्री आहे, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचीच सरकारची भूमिका – शिंदे
मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणावरील कायदेशीर बाबींवर मत मांडत शासनाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, यापूर्वी देखील सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. त्यासाठी केलेला कायदा उच्च न्यायालयात टीकलं देखील होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयात ते टीकलं नाही. मात्र आता आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे. आरक्षण रद्द झालं त्यानंतर 3700 मुलांना नोकऱ्या देण्याचं धाडस सरकारने केलं. जे काही होईल त्याला तोंड देण्याची तयारी ठेऊन नोकऱ्या दिल्या. अन्य सुविधाही सरकारने समाजाला दिल्या. मराठा समाजाला आरक्षण देण्याचीच सरकारची भूमिका आहे. आम्ही फसवणूक करू शकत नाही कारण, सरकार म्हणून आमचीही काही जबाबदारी आहेच. आता टिकणारं असंच आरक्षण समाजाला देऊ, असेही शिंदे म्हणाले.