मुंडेंसोबतच्या जुन्या मैत्रीला जागले खासदार कोल्हे? बीडमधील पवारांच्या सभेला मारली दांडी
बीड : येथे आज (17 ऑगस्ट) राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला जिल्ह्यास राज्यातील अनेक नेते उपस्थित आहेत. मात्र याच सभेकडे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाठ फिरवली आहे. कोल्हे का अनुपस्थित राहिले, यामागील नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पण या निमित्ताने कोल्हे यांनी मुंडेंसोबतच्या जुन्या मैत्रीला जागत पवारांच्या सभेला दांडी मारल्याचे सांगितले जात आहे. (NCP MP Dr. Absence of Amol Kolhe for sharad Pawar rally beed)
पवार यांच्या सभेला राष्ट्रवादीतील काही नेते उपस्थित राहु नये, म्हणून अजितदादांच्या गटातील नेते वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करत असल्याचे दिसून येत होते. नेतेही दोन्ही बाजूंची नाराजी टाळावी यासाठी स्वतः सार्वजिनक व्यासपीठावर जाण्यासाठी उत्साही दिसत नव्हते. यातच अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे यांची मैत्री सर्वश्रृत आहे. त्यामुळे ते मैत्रीला जागणार की राजकीय गुरुची साथ देणार? याकडे सर्वांच लक्ष लागले होते.
कोल्हे आणि मुंडे मैत्री :
काही वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालिकावेळी कोल्हे अडचणीत होते, त्यावेळी धंनजय मुंडे यांनी कोल्हे यांना मदतीचा हात दिला असं बोललं जातं. याच दरम्यान कोल्हे यांची भाषणशैली पाहता एक ओबीसी चेहरा म्हणून त्ंयानी पक्षात यावे यासाठी मुंडे यांनी पुढाकार घेतला. अमोल कोल्हे यांचा पक्षप्रवेश ते शिरूर लोकसभा निवडणूक यात धनंजय मुंडे यांचा मोठा सहभाग होता.
आताही अजित पवार हे पक्षातून बाहेर पडले, त्यावेळी कोल्हे यांनी शपथविधीला हजेरी लावत धनंजय मुंडे यांची साथ दिली. पण दोनच दिवसात ते शरद पवार यांच्या सोबत आले. मात्र त्यानंतर कोल्हे यांनी कोणत्याही नेत्यावर टीका करणे, भूमिका घेणे टाळले होते. आता तर थेट मित्र आणि गुरु आमने-सामाने आले आहेत. अशा संकटात अमोल कोल्हे यांनी मैत्रीला साथ दिली असं बोललं जातं.