पितृपक्षात बनवा मराठवाड्याची खास अख्ख्या गव्हाची खीर; खीर फुटणार नाही, ‘ही’ पद्धत लक्षात ठेवा

Whole Wheat Kheer Recipe : पितृपक्षात पूर्वजांच्या स्मरणासाठी केली जाणारी अख्ख्या गव्हाची खीर ही मराठवाड्यातील खास पारंपरिक डिश आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 29T193548.766

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाला सुरुवात (Marathwada) होताच घरोघरी पितृपक्षाचा काळ सुरु होतो. या काळात आपल्या पूर्वजांचं स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली जाते. पितरांसाठी तयार केल्या जाणाऱ्या जेवणात सात्त्विक आणि पारंपरिक पदार्थांना विशेष महत्व असतं. महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात पितृपक्षाच्या जेवणात अख्ख्या गव्हाची खीर आवर्जून केली जाते. पारंपरिक चव आणि पौष्टिकतेसाठी ओळखली जाणारी ही खीर पितृपक्षातील खास पदार्थ मानली जाते.

अख्ख्या गव्हाची ही पारंपरिक खीर महाराष्ट्रासह मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात केली जाते. कर्नाटकातही हा पदार्थ लोकप्रिय असुन तिथे त्याला ‘गोधी पायसा’ असं म्हटलं जातं. पितृपक्षात पूर्वजांना सात्त्विक अन्न दाखवलं जातं आणि श्राद्धाच्या जेवणात गोड पदार्थाला विशेष महत्व असतं. गहू हा समृद्धी, निर्मिती आणि अन्नाचं प्रतिक मानला जातो. खपली गहू किंवा जोड गहू पौष्टिक असल्याने या खिरीसाठी त्याचा वापर केला जातो.

घरी खीर बनवताना गहू शिजल्यानंतर गूळ किंवा दूध घातल्यावर खीर फुटण्याची किंवा पाण्याचा अंश वेगळा होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकजण ही पारंपरिक खीर करण्याचं टाळतात. मात्र गहू योग्य पद्धतीनं शिजवणं, गूळ घालताना योग्य तापमान राखणं आणि काही सोप्या टिप्स लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. या पद्धतीनं खीर बनवल्यास तिची चव, पोत आणि पारंपरिकपणा कायम ठेवता येतो.

अख्ख्या गव्हाची खीर करण्यासाठी लागणारे साहित्य

खपली गहू – अर्धा किलो
गरम पाणी- गरजेनुसार
बारीक चिरलेला गूळ – दीड कप
सुंठ पावडर – १ चमचा
बडीशेप पावडर – १ चमचा
खसखस – २ चमचे
काजू- १० ते १२
सुक्या खोबऱ्याचे पातळ काप – अर्धा कप
साजूक तूप – २ चमचे
दूध

कृती

1. सगळ्यात आधी खपली गहू दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. खपली गहू नसतील तर साधे गहू देखील वापरु शकता. गव्हावर थोडे पाणी शिंपडून ते पाखडून घ्या आणि खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये थोडे हलके कुटून (सडून) घ्या. ज्यामुळे गव्हाच्या वरची टरफले निघतील.

2. कुकरमध्ये तयार केलेले १ कप सडलेले खपली गहू घ्या. त्यात गरजेप्रमाणे गरम पाणी घालून गव्हाला मऊ होईपर्यंत ४ ते ५ शिट्ट्या काढून चांगले शिजवून घ्या. गहू हाताने मऊ दाबला गेला पाहिजे.

3. एका भांड्यात बारीक चिरलेला गूळ आणि थोडे पाणी घालून गूळ विरघळून घ्या. एका जाड बुडाच्या पातेल्यात २ चमचे साजूक तूप गरम करा. त्यात सुक्या खोबऱ्याचे पातळ काप आणि काजू घालून सोनेरी रंगावर परतून घ्या.

4. आता शिजवून घेतलेला मऊ गहू या तुपामध्ये चांगला परतून घ्या. त्यानंतर त्यात तयार केलेले गव्हाचे मिश्रण आणि विरघळलेल्या गुळाचे पाणी घाला.

5. वरून सुंठ पावडर आणि बडीशेप, खसखस पावडर घाला. यामुळे खिरीला अप्रतिम पारंपरिक सुगंध आणि चव येईल. सर्व मिश्रण मंद आचेवर १० मिनिटे चांगले उकळू द्या, ज्यामुळे गूळ गव्हामध्ये चांगल्या प्रकारे मुरेल.

खीर फुटू नये म्हणून टिप्स

1. गहू शिजवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करा, थंड पाणी घातल्यास गव्हाचा पोत बिघडतो. खिरीत गूळ किंवा गुळाचे पाणी गुळाचे पाणी घालताना गॅस बंद करा किंवा आच एकदम मंद ठेवा. गरम खिरीत एकदम उकळता गूळ किंवा दूध टाकल्यास खीर फाटण्याची किंवा फुटण्याची शक्यता असते.

2. ही खीर पारंपरिक पद्धतीने गूळ घालून दाट बनवली जाते. जर आपल्याला दूध घालून खायची असेल तर वाटीत खीर काढून वरून कोमट किंवा थंड दूध घालू शकतो.

3. साध्या गव्हाऐवजी खपली गव्हाचा वापर करा, कारण तो शिजल्यावर चिकट होत नाही आणि खिरीची टेक्सचर उत्तम राहते.

4. गूळ आणि गहू एकत्र केल्यानंतर खीर खूप जास्त वेळ उकळू नका, नाहीतर गूळ कडक होऊन खीर कोरडी पडू शकते.

follow us