पावसाच्या तुटीचा मराठवाड्याच्या शेतीला फटका; 3.5 लाख हेक्टर क्षेत्र घटलं, वाचा चिंताजनक आकडेवारी

मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये अपुऱ्या पावसाचा फटका दिसून आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेतही 2 लाख हेक्टरने पेरा कमी झाला आहे.

News Photo   2026 08 26T133547.963

मराठवाड्यात यंदा पावसाने पाठ (Marathwada) फिरवल्याने खरीप हंगामातील लागवडीला मोठा फटका बसला आहे. विभागात यंदा 586.1 मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ 479.1 मिमी पाऊस झाला असून, सरासरीपेक्षा 20.3 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. परिणामी, लागवडीखालील क्षेत्रात तब्बल 3.5 लाख हेक्टरची घट झाली असून, यंदा 46.19 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या पाच वर्षांची सरासरी 49.72 लाख हेक्टर असून, त्याच्या तुलनेत यंदाची पेरणी 7 टक्क्यांनी कमी आहे.

पावसाच्या कमतरतेचा परिणाम मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दिसून आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेतही यंदा पेरणीचे क्षेत्र सुमारे 2 लाख हेक्टरने कमी झाले आहे. परभणी आणि लातूर जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर असून, परभणीत 34.7 टक्के तर लातूरमध्ये तब्बल 40.6 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या निवडीपासूनच बदल करावा लागला असून, पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन कमी जोखमीच्या पिकांकडे कल वाढला आहे.

पावसाची प्रतीक्षा संपणार! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात जोरदार कोसळणार

नगदी पिकांच्या क्षेत्रात झालेली घट ही यंदाच्या हंगामातील चिंतेची बाब ठरली आहे. कापसाचे क्षेत्र 2.65 लाख हेक्टरने घटून 12.14 लाख हेक्टरवर आले आहे. ऊस लागवडीची स्थितीही मोठ्या प्रमाणात बदलली असून, सरासरी 3.24 लाख हेक्टर असलेले क्षेत्र यंदा केवळ 43,821 हेक्टरवर आले आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे पाणी जास्त लागणाऱ्या पिकांऐवजी शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका आणि सूर्यफूल या पिकांना अधिक पसंती दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

सोयाबीनच्या लागवडीत यंदा 12 टक्क्यांनी वाढ झाली असून, त्याचे क्षेत्र 25.74 लाख हेक्टरवर पोहोचले आहे. मक्याचे क्षेत्रही 5 टक्क्यांनी वाढून 2.68 लाख हेक्टर झाले आहे. सूर्यफुलाच्या लागवडीत सर्वाधिक 39 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, क्षेत्र 2,289 हेक्टरवर पोहोचले आहे. त्यामुळे पावसाच्या तुटीचा केवळ पेरणीच्या क्षेत्रावरच नव्हे, तर मराठवाड्यातील पिकांच्या स्वरूपावरही मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे.

follow us