एकनाथ शिंदे यांचं पुन्हा एकदा धक्कातंत्र; परभणी-हिंगोलीत मात्तबर बाजूला करत नव्या चेहऱ्याला संधी
शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांसोबतच अल्पसंख्याक समाजाला महायुतीकडे खेचण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंनी टाकलेला हा पत्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था (Election) मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ‘धक्कातंत्र’ वापरले आहे. राजकीय वर्तुळातील सर्व अंदाज बाजूला सारत, उपमुख्यमंत्र्यांनी अल्पसंख्याक समाजातील तरुण चेहरा सईद खान यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सईद खान हे सध्या शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष असून ते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कोअर टीमचे अत्यंत विश्वासू सदस्य मानले जातात.
सईद खान यांच्या उमेदवारीमुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांसोबतच अल्पसंख्याक समाजाला महायुतीकडे खेचण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंनी टाकलेला हा पत्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी टाकलेली ही राजकीय खेळी चर्चेचा विषय ठरत आहे. सईद खान हे गेल्या 15 वर्षांपासून एकनाथ शिंदे यांचे अत्यंत कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. 9 जुलै 2023 रोजी त्यांच्याकडे शिवसेना अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
भाजपकडून आयारामांना संधी; पक्षात प्रवेश करताच उमेदवारी, निष्ठावंतांची नाराजी उघड
या जबाबदारीनंतर त्यांनी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रम राबवून पक्ष मजबूत केला. त्यांच्या नेतृत्वात राज्यातील विविध नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमधील सुमारे 900 अल्पसंख्याक लोकप्रतिनिधींनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सईद खान यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रासप कडून निवडणूक लढवत तब्बल 55,000 मते घेतली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतून अल्पसंख्याक समाजासाठी तब्बल 5,600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
मध्ये प्रामुख्याने शिष्यवृत्ती आणि अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या निधीचा समावेश आहे. याशिवाय, केवळ पाथरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी 950 कोटी रुपयांची विकासकामे केली. 2025 च्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी पाथरी नगरपरिषदेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आणली. तिथे शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवक निवडून आले. सोनपेठमध्ये आघाडी करून नगराध्यक्ष आणि 10 नगरसेवक, तर मानवतमध्ये 5 नगरसेवक निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
नुकत्याच पार पडलेल्या 2026 च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी पाथरी मतदारसंघातून 2 जिल्हा परिषद सदस्य आणि 4 पंचायत समिती सदस्य निवडून आणले. तसेच पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) 9 संचालक निवडून आणून आपले वर्चस्व सिद्ध केले. सईद खान यांच्या या कौशल्याची दखल घेत आता त्यांना थेट विधान परिषदेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. अल्पसंख्यांक समाजात या निर्णयाचे स्वागत होत असल्याचे चित्र आहे.