पैठणमध्ये आईच बनली वैरी: अडीच वर्षाच्या चिमुकल्याला पाच लाखात विकले
Chhatrapati Sambhajinagar Crime : आई आणि मुलाचं नातं जगात सर्वात जवळच आणि प्रेमाचे समजलं जातं. आई आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते. आई आपल्या मुलांची वैरी कधीही होऊ शकत नाही. पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका आईने आपल्या पोटच्या अडीच वर्षाच्या मुलाला विकल्याचा धक्कादायक घटना घडली आहे.
पैठण तालुक्यातील एका महिलेने अडीच वर्षाचे बाळ एका अनाथालयाला विकले. तेच बाळ अनाथालय मालक व त्याची पत्नी यांनी तिसऱ्याच व्यक्तीला पाच लाख रुपयांना विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालक आश्रमात हा संपूर्ण प्रकार घडला. खरेदी विक्रीची माहिती मिळताच पोलिसांनी दामिनी पथकाला हाताशी घेऊन सापळा रचला. पोलिसांनी अनाथालय चालवणाऱ्याला मुलं दत्तक देण्याच्या परवान्याची विचारणा केली असता त्यांच्याकडे तसा परवाना आढळला नाही.
त्यानंतर पोलिसांनी बालकाला ताब्यात घेऊन अनाथालय चालकाला बालकल्याण समिती समोर हजर केलं. दरम्यान या प्रकरणी बालकल्याण समितीच्या आदेशाप्रमाणे जवाहर नगर पोलिस ठाण्यामध्ये मुलाची आई, मामा, अनाथालय चालक व त्याची पत्नी अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.