लाकडी काठ्या, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, चोरीच्या संशयावरून तरुणाचा निर्घृण खून; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Beed Murder Case : मोबाईल आणि ५० हजार रुपये चोरल्याच्या संशयातून तरुणाला काठ्यांनी बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 11 17T142028.967

Beed Murder Case :  वाणगाव (Beed) येथे चोरीच्या संशयातून एका तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. मोबाईल आणि ५० हजार रुपये चोरल्याचा आरोप करत पाच जणांनी संभाजी सारूक याला लाकडी काठ्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संभाजी याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत संभाजी सारूक हा धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील नांदगाव येथील रहिवासी होता. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार ते रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास वाणगाव येथे अशोक उर्फ पप्पू कागदे, पवन रोमन आणि अन्य तीन जणांनी त्याला अडवले. मोबाईल आणि ५० हजार रुपये चोरी केल्याचा आरोप करत त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल परत करण्याची मागणी केली. याच कारणावरून आरोपी आणि संभाजी यांच्यात वाद निर्माण झाला.

वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. आरोपींनी संभाजीच्या डोक्यावर लाकडी काठ्यांनी वार केले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी अन्य तीन अनोळखी व्यक्तींनीही हल्ल्यात सहभाग घेतला. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संभाजीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात दोन नामनिर्देशित आणि तीन अनोळखी अशा एकूण पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०, १०३(१) आणि ३(५) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक उर्फ पप्पू कागदे आणि पवन रोमन यांच्यासह अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली.

follow us