राम मंदिर सोहळ्याचं पॉलिटिक्स! राजना निमंत्रण, उद्धव ठाकरेंना फुली; महाजनांनी सांगितलं कारण

राम मंदिर सोहळ्याचं पॉलिटिक्स! राजना निमंत्रण, उद्धव ठाकरेंना फुली; महाजनांनी सांगितलं कारण

Girish Mahajan replies Sanjay Raut : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची (Ram Mandir) जय्यत तयारी सुरू आहे. 22 जानेवारी रोजी हा सोहळा होणार आहे. यासाठी देशभरातील व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठविण्यात येत आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) निमंत्रण पाठवले गेले नाही. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तर रोजच टीका करत आहेत. त्यांच्या या टीकेला आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खोचक उत्तर दिले. उद्धव ठाकरे साधे आमदार आहेत. केंद्राच्या व्हीव्हीआयपीच्या यादीत उद्धव ठाकरे नसतील. राज ठाकरे असतील म्हणून राज ठाकरे यांना बोलावलं असेल, असे उत्तर महाजन यांनी दिले.

मंत्री गिरीश महाजन यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्याकडून होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते पुढे म्हणाले, अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंचं योगदान काय. घरात बसून भूमिका घेणं आणि प्रत्यक्ष कारसेवा करणं यात फरक आहे. आम्ही तर वीस वीस दिवस तुरुंगात होतो. तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते?, असा सवाल महाजन यांनी केला. उद्धव ठाकरेंनी कारसेवा केल्याचा एकतरी फोटो संजय राऊतांनी दाखवावा असे आव्हान महाजन यांनी दिले.

Girish Mahajan : ‘संजय राऊतांच्या डोक्याचा इलाज करा’ ‘त्या’ वक्तव्यावर महाजनांचा खोचक टोला

राम मंदिरासाठी शिवसेना उबाठा गटाने एक कोटी रुपयांची देणगी दिली होती असे सांगितले जात आहे. पण, अशी एक कोटी रुपयांची देणगी अनेक लोकांनी दिली आहे, असे सांगत महाजन यांनी ठाकरे गटातील नेत्यांच्या निधीच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातून देणगीचा ओघ सुरुच आहे. विविध प्रांतांतून विविध वस्तू अयोध्येला येत आहेत. येथील तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. राम मंदिर ट्रस्टकडून विविध प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रणंही दिली जात आहेत. राज्यातील अनेक व्यक्ती, धार्मिक, सामाजिक संस्थांना अशी निमंत्रणं मिळाली आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळालेलं नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube