लक्ष्मण हाके यांच्या ‘तुला दांडकच काढतो’ला आमदार पंडितांचा घणाघाती पलटवार, संघर्ष पेटणार…

MLA Vijaysinh Pandit vs Laxman Hake : बीडमध्ये आता नवा संघर्ष उभा राहण्याची परिस्थिती आहे. ओबीसी समाजाच्या बैठकीत लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने पंडित समर्थकांमध्ये संतापाची लाट आहे. याबाबत आता आमदार विजयसिंह पंडित यांनी प्रतिक्रिया दिली असून यावरून पुन्हा नव्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
लक्ष्मण हाके हा श्वान आहे. त्यावर जास्त मी बोलणार नाही आणि हा अदखलपात्र हा माणूस आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे. कारण हा लढा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. आम्ही मनोज दादा जरांगे पाटील यांचे होर्डिंग लावले आहेत, त्यात चुकीच काही मजकूर लिहलं आहे का? आमच्या मतदार संघातील लोकांनी या लक्ष्मण हाके नावाच्या श्वानाला ओळखलं आहे. याने या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात प्रचार केला आहे, याने माझ्या मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला आणि गल्ली बोळ्यात फिरला, पण जिंकून कोण आलं आणि त्याने ज्या उमेदवाराचा प्रचार केला त्याच डिपॉझिट सुद्धा जप्त झालं आहे.
हा दलाल श्वान आहे आणि हा स्ट्रीट डॉग आहे आणि हा रिचार्जवाला डॉग आहे. त्यामुळे आम्हाला सगळं माहीत हा कोणाच्या बोलण्यावरून भुंकतो आहे, ते आणि त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे. हा मंत्रालयात दलालगिरी करत असतो आणि हे सगळ्या मंत्रालयातील लोकांना माहीत आहे. धनंजय मुंडे यांनी त्यांना कोणत्या कार्यक्रमात बोलावलं आहे, हे मला माहीत नाही, पण हा प्रीपेड श्वान आहे आणि अदखलपात्र आहे, अशी टीका विजयसिंह पंडित यांनी म्हटलं आहे. लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांचा मनोज जरांगे यांना आतून समर्थन असल्याचा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
मनोज जरांगेंना आमदार 10-15 लाख रुपये देतात; मुंबई मोर्चाच्या बैठकांवरून हाकेंचा खळबळजनक आरोप
अजित पवार सत्तेत असताना त्यांचे आमदार मनोज जरांगे यांच्या व्यासपीठावर जातात, मनोज जरांगे यांच्या मांडीला मांडी लावून बसतात हे राज्यकर्त्यांना दिसत नाही? मनोज जरांगेंकडे सत्तेतले राज्यकर्ते जे दुर्लक्ष करत आहे, त्याची किंमत सत्तेतील राज्यकर्त्यांना मोजावी लागत आहे. आमचे आरक्षण हे संवैधानिक आहे. मात्र अजित पवारचे आमदार माझे पुतळे जाळतात, मी आता स्वतः गेवराईला जात आहे. माझे खुले आव्हान आहे, बघतो कोण मला अडवते ते ? असा इशारा देखील यावेळी लक्ष्मण हाके यांनी मराठा नेत्यांना दिला.
महाराष्ट्रात मराठेत्तर मुख्यमंत्री मराठ्यांना चालत नसल्याने मनोज जरांगेंकडून देवेंद्र फडणवीसांना ठरवून लक्ष केले जात असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. बीडच्या गेवराई मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष निर्माण झालाय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांना उद्देशून आक्षेपार्ह विधान केले होते. याच निषेधार्थ पंडित समर्थकांनी गेवराई मध्ये लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याचे दहन करत निषेध नोंदवला. दरम्यान आता त्याच ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांनी एकत्रित येत हाके यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक घातला आहे. दरम्यान सध्या गेवराई मध्ये पंडित विरुद्ध हाके समर्थकांमध्ये यामुळे संघर्ष निर्माण झाला आहे.