मला तू खूप आवडते! बीडमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

या प्रकारानंतर पीडित तरुणीने तत्काळ आपल्या नातेवाईकांसह पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

News Photo   2026 04 11T144329.393

बीड शहरातील गांधीनगर भागात (Beed) एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीनं केवळ विनयभंगच केला नाही, तर त्याने भररस्त्यात पीडितेसह तिच्या बहिणीला मारहाण केली आहे. तसंच जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ वर्षीय पीडित तरुणी आपल्या बहिणीसोबत स्कूटीवरून स्टेडियमच्या दिशेनं जात होती. गांधीनगर परिसरातून जात असताना आरोपी अकबर याकुब कुरेशी याने आपल्या गाडीने त्यांचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर त्याने पीडितेची स्कूटी अडवली. यानंतर आरोपी पीडितेजवळ आला. ‘तू मला खूप आवडतेस’ असं म्हणत आरोपीनं तिचा हात धरला. एवढ्यावरच न थांबता त्याने पीडितेची ओढणी ओढून अश्लील वर्तन करत विनयभंग केला.

धक्कादायक! बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, कारण काय?

यावेळी पीडितेनं आणि तिच्यासोबत असलेल्या बहिणीने आरोपीचा प्रतिकार केला. मात्र, संतापलेल्या आरोपीनं दोघींनाही चापटाने मारहाण केली. तसेच प्रकरणाची कुठेही वाच्यता केल्यास “जीवे मारून टाकेन,” अशी धमकी देऊन तिथून पळ काढला. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीने तत्काळ आपल्या नातेवाईकांसह पेठ बीड पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली.

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अकबर याकुब कुरेशी याच्या विरोधात विनयभंग, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. बीड शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

follow us