पाणी कपातीसह पावसाळापूर्व कामावर मुंबई मनपाचा मोठा निर्णय, आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

सध्या भातसा, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा यांसारख्या प्रमुख धरणांतील पाणी पातळी खालावली आहे.

News Photo   2026 04 28T182704.005

बृहन्मुंबई क्षेत्रात कार्यरत विविध प्राधिकरणे (BMC) आणि यंत्रणांनी आपापसांत समन्वय ठेवून पावसाळापूर्व कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत. पावसाळापूर्व तयारी प्रभावीपणे करून त्यावर अंमलबजावणी करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर विविध प्राधिकरणाची संयुक्त बैठक आज (दिनांक २८ एप्रिल २०२६) बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पार पडली त्यावेळी हे निर्देश देण्यात आले.

सध्या उन्हाळ्याची सुरुवात आहे. पावसाळा अजून दूर आहे तरीही त्याधीच मुंबईकरांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आहे. मुंबई महानगरपालिकेने येत्या १५ मेपासून संपूर्ण मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील साठा वेगाने खाली जात असल्याने, यासंदर्भातला निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, पावसाळाही आता अल निनोच्या प्रभावामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनला उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या मुंबईला पाणाी पुरवणाऱ्या सातही धरणांमध्ये मिळून केवळ २८ टक्के (४.१६ लाख दशलक्ष लीटर) पाणीसाठा शिल्लक आहे. जर पाणी कपात केली नाही, तर हा साठा केवळ ६ जुलैपर्यंतच पुरेल. मात्र, मान्सूनच्या लहरीपणाचा विचार करता प्रशासनाला हा साठा १७ ऑगस्टपर्यंत पुरवायचा आहे. त्यामुळेच १० टक्के कपातीचा हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत असणार आहे, फक्त सरासरी पुरवठ्यातून थोडा कमी सप्लाय असेल, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, आता मुंबईची दररोजची पाण्याची गरज ४४६३ दशलक्ष लीटर असताना, सध्या ४००० दशलक्ष लीटर पुरवठा केला जात आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आणि ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी पालिकेने राज्य सरकारकडे भातसा आणि वैतरणा धरणांतील ‘राखीव साठा’देण्याची विनंती केली आहे. भातसामधून १४७ एमसीएम आणि वैतरणातून ९० एमसीएम अतिरिक्त पाणी मिळवण्यासाठी पालिका प्रयत्नशील असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकारकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे, अशी माहिती आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे.

सध्या भातसा, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा यांसारख्या प्रमुख धरणांतील पाणी पातळी खालावली आहे. २७ एप्रिलच्या आकडेवारीनुसार, धरणांतील एकूण साठा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी अंघोळ, कपडे धुणे आणि इतर घरगुती कामात पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होऊ नये, यासाठी आतापासूनच पाणीबचतीवर भर देणे आवश्यक झाले आहे.

follow us