राज्यात हवामानाचा दुहेरी तडाखा; पुणे-मुंबईत पावसाची हजेरी, विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट

पुणे शहर आणि जिल्ह्यात दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

  • Written By: Published:
Untitled Design 73 1

Mumbai, Pune lashed by pre-monsoon rains : राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी प्रभाव पाहायला मिळत आहे. एकीकडे मान्सूनपूर्व पावसाने मुंबई आणि पुण्यासह अनेक भागांना दिलासा दिला असताना, दुसरीकडे विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण होते आणि शहरातील काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. तर पुणे शहर आणि जिल्ह्यात दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

शहरातील अनेक भागांत मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस झाला. काही वेळ झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आणि वाहतुकीचा वेग मंदावला. हवामान विभागाने पुण्यासाठी यलो अलर्ट जारी केला होता. पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. अवघ्या तासाभराच्या पावसामुळे भोर शहराला जोडणाऱ्या नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावर गुडघाभर पाणी साचले. पुलाला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते.

पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. पुलावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात न आल्याने नागरिकांनी प्रशासन आणि ठेकेदाराविरोधात नाराजी व्यक्त केली. पहिल्याच पावसात रस्त्यावर ओढ्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणात पुण्यातील तिसरी कारवाई, सीबीआयच्या कारवाईत मनीषा हवालदारला अटक

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसरातही दुपारनंतर मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. काळ्या ढगांच्या गर्दीनंतर अचानक सुरू झालेल्या पावसामुळे वाहनचालकांची धावपळ उडाली. मात्र, उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण असून या पावसामुळे खरीप हंगामासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, विदर्भ मात्र उष्णतेने होरपळत आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भाला हवामान विभागाने उष्णतेचा रेड अलर्ट दिला आहे. हवामान तज्ज्ञ प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या भागांत उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. पुढील पाच ते सहा दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता असून काही भागांमध्ये तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.

अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली, तरी उष्णतेपासून तातडीचा दिलासा मिळण्याची चिन्हे सध्या दिसत नाहीत.

follow us