नाना पटोले यांचे विमान आले, पण नाना आलेच नाही; नाना नाराज का?

नाना पटोले यांचे विमान आले, पण नाना आलेच नाही; नाना नाराज का?

मुंबई (प्रफुल्ल साळुंखे) : महाविकास आघाडीची राज्यातील सर्वांत मोठी वज्रमुठ सभा आज छत्रपती संभाजीनगर येथे झाली. या जाहीर सभेला ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षातील अनेक बडे नेते उपस्थित होते. या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे गट आणि भाजपचा जोरदार समाचार घेतला. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले हे देखील या सभेला हजर राहणार होते. मात्र, सभेला पटोले यांनी दांडी मारली. दरम्यान, नानांनी या सभेला दांडी का मारली ? याविषयी तर्क वितर्क लावण्यात येत आहे.

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठी आज सकाळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे छत्रपती संभाजीनगर येथं येणे अपेक्षित होते. सकाळी येणाऱ्या विमानात त्यांचे तिकीट देखील काढण्यात आले होते. पण नाना सकाळच्या विमानाने सभेच्या ठिकाणी आलेच नाहीत. याच वेळी काहीतरी गडबड असल्याची चर्चा रंगली होती. पण नाना एक कार्यक्रमला गेले आहेत. ते वाहनाने छ्त्रपती संभाजी नगर येथे येतील असंच शेवटपर्यंत सांगण्यात आलं. मात्र, संध्याकाळी सभेची वेळ झाली तरी नाना पटोले सभेकडे फिरकल्याचं दिसलं नाही. त्यामुळं नानांनी सभेला दांडी मारली असल्याचे स्पष्ट झाले होते.

Pravin Darekar : अजूनही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंचं बंड पचवू शकले नाहीत… 

यावेळी नाना पाटोले यांचे सहाय्यक, त्यांच्या जवळ सतत सावली सारखे राहणाऱ्या काही व्यक्तींना याबाबत विचारले असता सांगण्यात आलं की, आम्हाला नाना कुठे गेले माहिती नाहीत. दोन दिवस आम्ही नानाच्या संपर्कात नाही. विचारुन सांगतो की नाना कुठे आहेत? आम्ही आजारी आहोत, त्यामुळे नानांसोबत नाहीत, अशी विविध उत्तर नाना यांच्या जवळच्या व्यक्तींनी दिली. दरम्यान, पटोले यांच्या अनुपस्थितीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाषण केले.

नाना पाटोले सभेला न येणे हा राजकीय रणनितीचा भाग होता का? अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. कारण, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या बद्दल केलेल्या विधानाबद्दल उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस पक्षाचे सहकारी हे राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेस नेत्याच्याच्या विरोधात भूमिका मांडतात. त्यामुळं त्या सभेला अध्यक्ष म्हणून जाणे योग्य नाही, अशी भूमिका नाना पाटोले यांनी घेतली का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

खरंतर गेल्या काही दिवसात कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कुरबुरी वाढल्या आहेत. विशेषता: नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीपासून पक्षात नाना पाटोले आणि पक्षातील नेत्यात कुरबुरी सुरु आहे, ही देखील पार्श्वभूमी नानांच्या गैरहजर असण्याला असू शकते. गेल्या काही दिवसात उध्दव ठाकरे आणि शरद पवार हे बाळासाहेब थोरात यांच्याशी जुळवून घेतात. पक्षात त्यांना अधिक महत्व देतात. मात्र, प्रदेशाध्यक्ष म्हणून महाआघाडीत नानांना कायम दुय्यम स्थान देण्यात येते, अशीही चर्चा वरंवार समोर येते. त्यातूनच ही नाराजी वाढत जाते आहे का? असे अनेक मुद्दे हे नानांच्या नाराजीची कारणं असू शकतात. दरम्यान, याविषयी स्पष्टीकरण अजूनही पक्षाकडून किंवा नाना पटोले यांच्याकडून देण्यात आलेले नाही. नाना यांच्या नाराजीचे कारण लवकरच समोर येईल हे मात्र नक्की आहे. पण तोपर्यंत आघाडीत बिघाडी नाही ना, हा संदेश जनतेत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube