प्रेमाचं जाळं अन् 3 लाखांची लूट; AI च्या मदतीने खाकीचा बनावट डौल नाशिक पोलिसांनी उतरवला

Nashik तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी होणे अपेक्षित असताना, त्याचा गैरवापर गुन्हेगारीसाठी कसा केला जातो, याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Written By: Published:
प्रेमाचं जाळं अन् 3 लाखांची लूट; AI च्या मदतीने खाकीचा बनावट डौल नाशिक पोलिसांनी उतरवला

Nashik Police Arrest AI Generated Police : तंत्रज्ञान हे मानवाच्या प्रगतीसाठी वरदान ठरत असतानाच, काही गुन्हेगारी प्रवृत्ती त्याचा वापर समाजविघातक कृत्यांसाठी करत असल्याचे समोर आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने स्वतःचे पोलीस गणवेशातील बनावट फोटो तयार करून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या आणि त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या एका ‘हायटेक’ भामट्याला वावी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

‘AI’ चा वापर करून खाकीचा बनावट रुबाब, नेमकं प्रकरण काय?

अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आसिफ तडवी (रा. सिल्लोड) असे आहे. तडवीची मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. त्याने साध्या फोटोंवर AI तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचे पोलीस ठाण्यात बसलेले आणि पोलीस गणवेशातील अत्यंत हुबेहूब दिसणारे फोटो तयार केले होते. सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट करून तो स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे भासवत असे. खाकी वर्दीचा हाच खोटा रुबाब पाहून अनेक महिला त्याच्या जाळ्यात अडकल्याचा संशय आहे.

प्रेमाचं जाळं 3  लाखांची लूट आणि ब्लॅकमेलिंग

तडवीने इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिलेशी मैत्री केली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर विश्वास संपादन केल्यानंतर त्याने आपला खरा खेळ सुरू केला. कधी घरगुती अडचणी तर, कधी पोलीस ट्रेनिंगचे खोटे कारण सांगून त्याने पीडित महिलेकडून तब्बल 3 लाख रुपये उकळले. पीडितेने अधिक पैसे देण्यास नकार देताच तडवीने आपले क्रूर रूप दाखवले आणि AI च्या मदतीने पीडितेचे आक्षेपार्ह (Morph) फोटो तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग सुरू केले.

पोलिसांचा ‘सापळा’ आणि भामट्याला बेड्या

ब्लॅकमेलिंगला न घाबरता पीडित महिलेने धाडस दाखवून वावी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी महिलेला भेटण्याच्या बहाण्याने आरोपीला बोलावण्यास सांगितले आणि सापळा रचून आसिफ तडवीला अटक केली.

मोबाईलमध्ये सापडला ‘गुन्ह्यांचा खजिना’

पोलिसांनी तडवीचे दोन मोबाईल जप्त केले असून, त्यातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मोबाईलमध्ये AI ने तयार केलेले वर्दीतील शेकडो फोटो सापडले असून, तडवीने केवळ एकाच नाही, तर अनेक महिलांना अशाच प्रकारे जाळ्यात ओढल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्याशिवाय मोबाईलमध्ये अनेक महिलांचे चॅटिंग स्क्रीनशॉट आणि काही अश्लील व्हिडिओ देखील आढळून आले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी सोशल मीडियावरील चकचकीत फोटोंवर विश्वास न ठेवण्याचे तसेच कोणाशीही मैत्री करताना किंवा आर्थिक व्यवहार करताना त्याची पूर्ण शहानिशा करण्याचे आवाहन केले आहे. त्याशिवाय स्वतःचे वैयक्तिक फोटो अनोळखी व्यक्तीला न पाठवण्याचे आणि फसवणूक झाल्यास न घाबरता पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

follow us