विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा; संघटनेत कोणतही पद द्या, अजितदादांची CM पदाची तयारी सुरु

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 06 21T174959.466

NCP leader Ajit Pawar :  विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी  काँग्रेस पक्षाला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचे शिवधनुष्य पेलण्याची स्वत:हून तयारी दर्शवली. त्यासाठी मला विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करा, अशी थेट मागणी व्यासपीठावरुन पक्षाकडे केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आक्रमक भाषण करत पक्षाला आता आत्मपरिक्षण करावे लागेल असे म्हटले. ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर राव, अरविंद केजरीवाल आदी नेते मंडळी स्वबळावर त्यांच्या राज्यात सत्ता आणत असताना राष्ट्रवादी काँग्रेसला ते का शक्य होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी मी स्वत:  जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेच्या कामाचा मला अनुभव आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मी ऐनवेळी अनेकांना आमदारकीची उमेदवारी दिली, ते सर्वजण निवडून आले. आता मला संघटनेत कोणतही पद द्या त्या पदाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.  पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्या भाषणाला समोरुन गर्दीतून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी दाखविलेल्या आत्मविश्वासावर अनेकांनी टाळ्या वाजविल्या.

अजित पवार यांची ही मागणी म्हणजे ते आता अप्रत्यक्षरित्या नाहीतर थेटपणे संघटनेची सुत्रे स्वत:कडे घेण्याचा त्यांच्या प्रयत्न असल्याची प्रतिकिया व्यक्त होते आहे. आगामी निवडणुकीत पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून अजितदादांना पुढे यायचे नाही ना, अशी चर्चा त्यांच्या भाषणातनंतर रंगली आहे.

महागाई, बरोजगारीवरुन खासदार कोल्हेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

यावेळी त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना चांगलेच टोले लगावले. उद्या जर कुणाला मंत्रीपद पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अनेकजण म्हणाले आपला पहिला नंबर आला पाहिजे. पण फक्त भाषणं देऊन पहिला नंबर येणार नाही. भाषणातून तुम्हाला उर्जा मिळेल. पण आपण ज्या जिल्ह्यातून निवडून येतो तिथे तरी एकोपा ठेवला आहे का असा प्रश्न अजितदादांनी उपस्थित केला.

 

 

 

Tags

follow us