live now
योद्धा मैदानात! शरद पवारांचा दौरा ठरला; दिल्लीतील खलबतांनंतर महाराष्ट्र काढणार पिंजून
NCP Political Crisis Live Update : अजित पवारांच्या बंडानंतर काल (दि. 3) शरद पवारांनी कराड येथे जाऊन प्रितीसंगमावर जात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी आपण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे सांगत येत्या दोन ते तीन महिन्यात राज्यातील चित्र पालटलेले असेल असे सांगितले. त्यानंतर दुपारी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आमच्याकडे आमदारांचा पाठिंबा असल्याचा पुनुरूच्चार करत त्यांना कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा खुलासा केला असून, त्यानंतर आता काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठकीचे सत्र सुरू झाले आहे. तर, दुसरीकडे अजित पवारांच्या नव्या कार्यालयाचे आज उद्घाटन होणार आहे. या सर्व घडामोडींचा आढावा घेणार हा ब्लॉग…
LIVE NEWS & UPDATES
-
योद्धा मैदानात! शरद पवारांचा दौरा ठरला; दिल्लीतील खलबतानंतर महाराष्ट्र काढणार पिंजून
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. उद्या शरद पवार यांनी वायबी सेंटरमध्ये पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलवली आहे. तर 6 जुलैला राष्ट्रवादीची वर्किंग कमिटीची दिल्लीत बैठक पार पडणार आहे.
यानंतर 8 तारखेपासून शरद पवार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात पवार उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशातून करणार आहेत. 8 जुलैला पवार नाशिकमध्ये जाणार आहेत. तर 9 जुलैला धुळे आणि 10 जुलैला जळगावला जाणार आहेत.
वर्किंग कमिटीची बैठक महत्वाची :
दरम्यान, 6 जुलैला राष्ट्रवादीची दिल्लीत वर्किंग कमिटीची बैठक पार पडणार आहे. सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ही बैठक बोलावली आहे. पक्षाच्या घटनेच्या दृष्टीने, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीने महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता या बैठकीत आहे. वर्किंग कमिटीत कुणाचे बहुमत दिसणार? यावरही कायदेशीर लढाईचं भवितव्य ठरतं असतं.
-
पुणे राष्ट्रवादीवर दादांचा वरचष्मा; रुपाली पाटील यांचा अजित पवारांच्या गटात प्रवेश
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. आपल्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. त्यानंतर तात्काळ त्यांची प्रदेश प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, रुपाली पाटील यांच्या प्रवेशाने पुणे राष्ट्रवादीवर अजित पवार यांचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. पुण्यातील दोन्ही आमदार आणि अनेक पदाधिकारी अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. आता रुपाली पाटील ठोंबरे यांनीही अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे.
-
पवारसाहेब की अजितदादा? राष्ट्रवादीच्या आमदारांना घ्यावा लागणार फैसला; पक्ष एक व्हीप दोन
राष्ट्रवादीतील बंडाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसाठी दोन्ही गटांकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. उद्या (5 जुलै) रोजी अजित पवार यांनी वांद्रे येथे बैठक बोलवली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला आहे. तर उद्याच शरद पवार यांनी वायबी सेंटरमध्ये बैठक बोलवली आहे. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे आमदार संभ्रमात पडले असून नेमका कोणाचा व्हीप पाळायचा आणि कोणाच्या बाजूने जायचे याचा फैसला राष्ट्रवादीच्या आमदारांना उद्या करायचा आहे.
-
अजितदादांच्या एन्ट्री नंतर शिंदे गटाला हादरे : आमदारांना परतीचे वेध
अजित पवार यांच्या राज्य सरकरामधील एन्ट्रीनंतर शिंदेंची शिवसेना अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बहुमत असताना अजित पवारांना बरोबर घेण्याची काय गरज होती काय? असा सवाल शिंदेंचे आमदार विचारताना पाहायला मिळत आहे. तर काही आमदार हे काही आमदार हे मंत्रिपद मिळत नसल्याने उघड नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच आता शिंदे गटातील या नाराज आमदारांना ठाकरेंकडे परतीचे वेध लागल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंनी साद दिली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी खळबळ उडवून दिली आहे.
-
कुणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात गेल्यात काही कळत नाही : ठाकरे शैलीत राज यांची टीका
अजित पवारांचे बंड आणि भाजपसोबतचा शपथविधी हे जे झालं आहे ते अत्यंत किळसवानं झालं आहे. जनमताचा कौल तुम्ही घेतला तर प्रत्येक घरामध्ये शिव्या ऐकायला येतील दुसरे काही ऐकायला येणार नाही. कोण कोणाच्या पक्षात आहे, कोणाचा पत्ताच लागत नाही. कुणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात गेल्या हे काही कळतच नाही, चुकीचा कॅरम फुटला आहे, असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे.
ते पुढे म्हणाले, 1978 साली शरद पवार यांनीच सुरुवात केली, त्याचा शेवट त्यांच्यावरच होतो आहे. ही गोष्ट काल काय अचानक घडलेली नाही ही गोष्ट गेली कित्येक दिवस चालू होती. घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं माहिती नाही. दुर्दैवी परिस्थिती आहे महाराष्ट्राची,जे काही घडलेलं आहे असं यापूर्वी राज्यात कधी घडलं नाही, अशी खंतही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
-
फडणवीस यांना विस्थापित करण्याची खेळी भाजपने केंद्रातून केली
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून, आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी अजितदादांवर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, अजितदादांनी अट्टाहास कशासाठी केला हे कळत नाही. सकाळ दुपार संध्याकाळ कितीही मुहूर्त शोधले तरीही देवेंद्र फडणवीस यांच्या हाती काही लागत नाही. फार काम करून काय मिळणार असा सवाल उपस्थित करत फडणवीस यांना विस्थापित करण्याची खेळी भाजपने केंद्रातून केली आहे का? असा प्रश्नदेखील अंधारेंनी उपस्थित केला. कधीच राष्ट्रवादीचा भाग नव्हते. बाबासाहेबांनी जसे सांगितले आहे की, संस्थात्मक काम महत्त्वाचे आहे. जर काही काम करायचं असेल तर नेहमी संस्था निवडली पाहिजे. व्यक्ती की संस्था यात नेहमी संस्थाच निवडली पाहिजे.मूळ संस्था ही विचारांशी बांधील असते.
-
मी कुठेही जाणारा माणूस नाही - आव्हाड
मी शरद पवार यांना नेहमी भेटत असल्याने आजही भेटायला आलो आहे. मी कुठेही जाणारा माणूस नाही. शरद पवार यांना कधी न सोडणारा माणूस आहे. काँग्रेसचे नेते यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ९ मंत्री सोडून बाकी सगळे आमच्यासोबत असणार असा विश्वासही यावेळी आव्हाडांनी व्यक्त केला. मी काहीही घ्यायला आलेलो नाही. दोन दिवस झाले पवार साहेब भेटले नाही. त्यामुळे त्यांची भेट घ्यायला आल्याचे आव्हाड म्हणाले. तसेच आता बाहेर पडलेल्यांना सोन्याचे दिवस दाखवणारे शरद पवार आहेत. हे सांगताना आव्हाडांचे डोळे आणि आवाज भरून आला होता.
आम्ही शरद पवारांना सोडू हे पत्र जयंत पाटील यांच्या हातात देण्यात आलं होतं. जयंत पाटलांनी ते शरद पवारांना ते दिलंच नाही. त्यांना माहिती होतं की, हे पत्र पाहिल्यावर शरद पवारांना किती वाईट वाटेल. त्यावेळी त्यातील काही आमदारांचं म्हणणं होतं की, शरद पवारांना सोडा, त्यांना एकट राहू द्या, त्यांचं संपलं असं एका आमदाराने म्हटले होते.
-
नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने-सामने
नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने-सामने आले आहे. राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित बैठकीला अजित दादा गटाने विरोध केल्याने शरद पवार गटदेखील आक्रमक झाला आहे. नाशिक येथील कार्यालयावर छगन भुजबळ यांच्यागटाने ताबा घेतला आहे.
यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आहे. अजित पवार गटाकडून अजित दादांच्या समर्थनार्थ तर शरद पवार गटाकडून शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु आहे. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून दोन्ही गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
-
नाना पटोलेंसह काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, आ. कुणाल पाटील, माजी मंत्री डॉ विश्वजीत कदम, माजी आ.राहुल बोंद्रे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे होते.
-
सुनील तटकरेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार खासदार सुनील तटकरे यांनी स्वीकारला. राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल,उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री अनिल पाटील, मंत्री अदिती तटकरे हे उपस्थित होते.