सिना नदीवरील बुडीत बंधारे सर्वेक्षणास प्रशासकीय मान्यता; नदीपात्रात पाणीसाठा वाढणार

Ahilyanagar News : जलसंपदा विभागाने सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधणीसाठी 50 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे (Ahilyanagar News) सविस्तर सर्वेक्षण करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सर्वेक्षणासाठी 21 लाख 13 हजार रुपये खर्च मंजूर असून, तो महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत केला जाणार आहे. यामुळे नदीपात्राचे सौंदर्यवर्धन होईल व पाणी साठा वाढून परिसराला दीर्घकालीन सिंचन व पाणीपुरवठ्याचा लाभ मिळेल.
महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त श्री क्षेत्र चौंडी येथे सुमारे 1209 कोटींचा बृहद विकास आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यात चौंडी परिसरातील ऐतिहासिक व पौराणिक स्मृतीस्थळांचे जतन, पायाभूत सुविधा उभारणी, सिना नदी सुशोभीकरण व शुद्धीकरण तसेच दोन बुडीत बंधारे बांधणीचा समावेश आहे.
6 मे रोजी चौंडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत “श्री क्षेत्र चौंडी बृहद विकास आराखड्यास” मंजुरी देण्यात आली. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या (Ram Shinde) पाठपुराव्यामुळे एकूण सुमारे बाराशे कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला. यामध्ये सिना नदी सुशोभीकरण, नदीपात्र स्वच्छता, शुद्धीकरण व दोन बुडीत बंधारे प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.
विकास आराखड्यात चौंडी येथील स्मृतीस्थळांचे जतन व संवर्धनसाठी 681 कोटी 32 लाख रुपये, चौंडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांसाठी ३६० कोटी रुपये, सिना नदीवरील दोन बुडीत बंधारे बांधकामासाठी 50 कोटी रुपये अशा एकूण 1091 कोटी 32 लाखांच्या कामांचा समावेश आहे.
या निर्णयाचे स्थानिक नागरिक, विविध समाजघटक व सर्वपक्षीय नेत्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला साजेशी अशी चौंडी विकास आराखड्याची अंमलबजावणी होईल व सिना नदीवरील बुडीत बंधारे प्रकल्पामुळे या भागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.”
कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजपच्या वाट्याला? राम शिंदे पुन्हा मैदानात उतरणार