फडणवीस साहेब, ‘त्या’ घटनेमागचा मास्टरमाइंड…; कळमकरांचे थेट गृहमंत्र्यांना आवाहन
Ahmednagar News : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सध्या कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. यातच जनतेचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य एका तरुणाने केले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर शहरात विशेष लक्ष घालून अशा अपप्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी पावले उचलावीत. अशा घटना शहरात वारंवार का घडतात याची सखोल चौकशी करून यामागचा मास्टरमाईंड शोधला पाहिजे, अशी मागणी कळमकर यांनी केली आहे. (Ahmednagar Abhishek Kalamkar Devendra Fadanvis Action on Chhatrapati Shivaji Maharaj Offensive Statement )
Rahul Gandhi : राहुल गांधींची ‘घर वापसी’; खासदारी मिळताच सरकारी घरही मिळालं
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य असलेली क्लिप काही दिवसांपूर्वी नगर शहरात व्हायरल झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. मात्र या घटनेने शहरात वाढत असलेल्या असामाजिक प्रवृत्तींचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा घटनांमुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे. यांचं अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी थेट गृहमंत्र्यांना सवाल केला आहे.
काँग्रेसला संजीवनी मिळणार; महाराष्ट्रातही ‘पदयात्रा’ काढणार
कळमकर यांनी म्हटले आहे की, नगर शहरातील मुकुंदनगर भागातील एका तरूणाने शिवरायांविषयी आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप तयार करून ती समाज माध्यमांवर व्हायरल केली. त्याप्रकरणी संबंधित युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र असे असले तरी या घटनेने शिवप्रेमींमध्ये तीव्र रोष व संताप व्यक्त होत आहे. मुळात अशा प्रकारे आराध्य दैवताबाबत आक्षेपार्ह बोलण्याची हिंमतच कशी होते हा प्रश्न आहे. पोलिस प्रशासन हे कायद्याने कारवाई करतात परंतु, घाणेरड्या प्रवृत्तींना कायद्याचाही धाक राहिलेला नाही अशीच परिस्थिती आहे.
गृहमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे
सध्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. यामुळे आता खुद्द राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फडणवीस नेहमी सांगतात की महापुरुषांबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांची गय केली जाणार नाही. प्रत्यक्षात अशा बेताल वक्तव्यांची मालिका सुरुच आहे. याचाच अर्थ त्यांना कायद्याचा धाक उरलेला नाहीये. नगर शहरात तर असे प्रसंग वारंवार घडत आहे. अशा लोकांबाबत कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने गृहमंत्र्यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाला आदेश देणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा असे प्रकार समोर आल्यास रस्त्यावर उतरून चुकीच्या प्रवृत्तींना धडा शिकवण्याचा इशारा कळमकर यांनी दिला आहे.