स्मार्ट सिटी तालुक्याबाहेर कुणी नेली, उतारे दाखवण्याची वेळ येऊ देऊ नका : गोरक्षनाथ जामदार
Ahmednagar Politics : विधानसभा निवडणुका आल्यामुळे चुकीचे (Maharashtra Elections) आरोप करून तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची आहे हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे. त्यामुळे आरोप करतांना जरा जपूनच करा. स्मार्ट सिटी कुणी तालुक्याच्या बाहेर आणि कशासाठी नेली यासाठी जमिनीचे उतारे दाखवायची वेळ येवू देवू नका, असा इशारा कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांना (Vivek Kolhe) नाव न घेता दिला.
आमदार आशुतोष काळे यांच्यावर (MLA Aashutosh Kale) विवेक कोल्हे यांनी केलेल्या टीकेचा जामदार यांनी चांगलाच समाचार घेतला. जामदार पुढे म्हणाले, मतदारसंघाच्या विकासासाठी आ. काळेंनी तीन हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणला. या निधीतून झालेली कामे व प्रगतीपथावर असलेली कामे जनतेला दिसत आहेत. मात्र ज्यांच्याकडे विकासाची दृष्टीच नाही त्यांना हा विकास कधीच दिसणार नाही. आजपर्यंत त्यांच्याकडे चाळीस वर्ष सत्ता असताना त्या चाळीस वर्षांत जेवढा निधी आला त्यापेक्षा कित्येक पटींनी आ.आशुतोष काळे यांनी या पाच वर्षांत निधी आणला आहे.
खोटी बदनामी थांबवा अन्यथा.. आमदार आशुतोष काळेंचा विरोधकांना इशारा
ज्या कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नावर आजवर ज्यांनी आपली दुकानदारी चालविली त्यांची दुकानदारी पाच नंबर साठवण तलावामुळे कायमची बंद पडली. त्यामुळे यापुढे राजकारण करायचे तरी कशावर असा प्रश्न ज्यांना पडला आहे. त्यांना आ. काळे यांच्यावर टीका करून कुठेतरी चर्चेत राहायचं आहे. आमदार काळे यांचा स्वभाव मतदारसंघातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे जनतेने ज्या अपेक्षेतून आपल्याला सेवा करण्याची संधी दिली त्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी मागील अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले विकासाचे प्रश्न सोडवून दाखवले आहेत. हे विरोधकांना पचनी पडत नसल्यामुळे त्यांच्या पोटात मळमळ सुरू असून चुकीचे आरोप केले जात असल्याचे जामदार म्हणाले.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना ज्यांना चाळीस वर्षात बेरोजगारी दिसली नाही ते आज बेरोजगारीवर गळे काढीत आहे. तुम्ही वाढविलेली बेरोजगारी दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जाहीरनाम्यात एमआयडीसी आणण्याची वचनपूर्ती करून कोपरगाव मतदारसंघात एमआयडीसी आणली आहे. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न मिटणार आहे. खालच्या पातळीचे राजकारण करण्याची आमच्या नेत्याची परंपरा नाही. मात्र चुकीचे आरोप करून आपली राजकीय पोळी शेकली जाणार नाही हे लक्षात ठेवा, असा सल्ला गोरक्षनाथ जामदार यांनी विवेक कोल्हे यांना नाव न घेता दिला.
स्मार्ट सिटी जवळ कोल्हेंच्या कलेक्शन एजंटच्या नावावर जमीनी
आपल्या मातोश्री सत्तेचा वापर करून स्मार्ट सिटी कोपरगाव तालुक्याच्या बाहेर घेऊन गेल्या. त्या ठिकाणी कुणाच्या जमिनी आहेत हे जमिनीच्या उताऱ्यावरून सिद्ध झाल्यास तुम्हाला तोंडघशी पडावे लागेल. त्यामुळे उगाचच चुकीचे आरोप करू नका. टीका करून मतदारसंघात झालेला विकास झाकता येणार नाही. मात्र आपल्या कलेक्शन एजंटच्या नावावर असलेल्या स्मार्ट सिटीच्या जवळच्या जमिनीचे उतारे जर लोकांपर्यंत पोहोचले तर तोंडघशी पडाल, असा इशारा गोरक्षनाथ जामदार यांनी दिला.