अजितदादांच्या दोन शिलेदारांची फिल्डिंग अन् भुजबळ थेट शिर्डीत; नाराजी मात्र कायम

अजितदादांच्या दोन शिलेदारांची फिल्डिंग अन् भुजबळ थेट शिर्डीत; नाराजी मात्र कायम

प्रशांत गोडसे, शिर्डी 

NCP Shibir in Shirdi : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवसंकल्प शिबिराला शिर्डी येथे सुरूवात झाली आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलं होत. मात्र कुणा व्यक्तीसाठी नव्हे असे म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवारांवरील नाराजी अधोरेखित करत भुजबळांनी शिबिराला हजेरी लावली. यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी अजूनही कायम असल्याचं अधोरेखित झालं. शिर्डीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवसंकल्प शिबिरासाठी जेष्ठ नेते छगन भुजबळ दाखल झाले त्यावेळी त्यांनी आपण अजूनही नाराज असल्याचे संकेत दिले.

मंत्रिमंडळात डावल्याने नाराज

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आपल्या नाराजीसह शिर्डीतील नवसंकल्प शिबिरात पोहचले . ‘हे पक्षाचे शिबिर आहे, कुणा एका व्यक्तीचे नव्हे’, अशी माध्यमांना प्रतिक्रिया देत छगन भुजबळ यांनी शिबिराला हजेरी लावली. छगन भुजबळ यांच्या या प्रतिक्रियेत अजित पवार यांच्यावरील नाराजी स्पष्ट होती.

“लग्नात बुंदी वाढणं खासदाराचं काम नाही”, सुजय विखेंचा लंकेंना खोचक टोला

छगन भुजबळ शिबिरात सहभागी होणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. परंतु त्यांनी शिबिराला हजेरी लावली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीच्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला होता. परंतु माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “हे पक्षाचे शिबिर आहे, कुणा एका व्यक्तीचे नाही. मी थोडा वेळ आलो आहे. यामुळे सगळं काही स्वच्छ झाले नसल्याचे म्हणत छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रियेमध्ये नाराजी अधिक स्पष्टपणे दिसली. त्यांच्या या नाराजीचा रोख पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे असल्याचे दिसले. शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार की नाही यावर बोलताना त्यांनी चुप्पी साधली.

छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. त्यामुळे त्यांची अनुपस्थिति ठळक दिसली असती. त्यांनी थोडा वेळ का होईना शिबिराला हजेरी लावावी यासाठी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मोठे प्रयत्न केले. प्रफुल्ल पटेल हे माझ्याकडे दोन तास येऊन बसले होते. सुनील तटकरे यांनी मी शिबिराला यावं यासाठी खूप फोन केले. त्यामुळे मी थोडा वेळ शिबिरात सहभागी होण्यासाठी आलो आहे’, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

परंतु हे शिबिर दोन दिवस चालणार आहे. त्यामुळे शिबिरात दोन दिवस उपस्थित राहणार की नाही राहणार यावर छगन भुजबळ यांनी मौन बाळगणे पसंत केले. समता परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करत असून परिषदेचे काम चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यसभेचा प्रस्ताव अपल्याला आला होता. राज्यातच काम करायचे असल्याचे पहिलेच जाहीर केले आहे. येवलेकरांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे येवलेकरांसाठी काम करायचे असल्याचे सांगत आपण राज्यातच काम करण्यावर ठाम आहोत असे छगन भुजबळ म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube