मी देखील वाभाडे काढायला कमी पडणार नाही, जळगावच्या सभेतून अजित पवारांचा इशारा
Ajit Pawar on Sharad Pawar : आम्ही कुठंही गेलो तरी विकासाचे बोलतो. एकमेकांची उणीदुणी काढून जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नाही. काहीजण येतात, बेताल वक्तव्य करतात. आम्हाला टिका टिप्पणी करता येत नाही का? मी देखील एकएकाचे वाभाडे काढायला कमी पडणार नाही. पण त्यातून प्रश्न सुटणार नाहीत. थोडावेळ ऐकायला बरं वाटेल. काहीजण निव्वळ नौटंकी करतात. काहीजण भावनेला हात घालण्याचा प्रयत्न करतात. यातून महाराष्ट्राचे भले होणार नाही, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगावच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातून केला.
मगल्या काळात कांद्याचा प्रश्न निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पियुष गोयल यांना फोन केला. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे हे आम्ही त्यांना सांगितले. 24 रुपये 10 पैशांनी कांदा खरेदीचा निर्णय झाला. मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडेंना सांगितले की तुम्ही तातडीने दिल्लीला जा. दिल्लीत चर्चा करा. शेवटी शेतकरी अडचणीत आल्यानंतर सरकारने बघ्याची भूमिका घ्यायची नसते. त्यांच्या पाठिशी उभा राहिले पाहिजे, आम्ही अशाच प्रकारे महायुतीच्या माध्यमातून काम करतो आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पुढं आलेला आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जेवढे राजकीय पक्ष आहेत त्यांची बैठक घेतली. शेवटी चर्चा करुन मार्ग काढायचा असतो. त्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये लाठीचार्जला जबाबदार असलेल्या डीवायएसपीला निलंबित केलं, अजून तीन अधिकारी निलंबित केले. तसेच या आंदोलनात ज्या तरुणांवर केसेस दाखल झाल्या आहेत, त्या मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात साकारात्मक भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
जरांगेंकडून सरकारला एक महिना; उपोषण सोडण्यासाठी सीएम, डीसीएम, दोन्ही राजेंनी यावे
पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये मी होतो, त्यावेळी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण निर्णय घेतला होता पण दुर्दैवाने तो निर्णय हायकोर्टात टीकला नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी पुन्हा निर्णय घेतला, तो निर्णय हायकोर्टात टीकला पण सुप्रीम कोर्टात टीकला नाही. आता असं पुन्हा होता कामा नये. यासाठी कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता यातून मार्ग काढायचा आहे. पण काही लोक वेगळं सांगत आहेत, दिशाभूल करत आहेत. सर्वाना न्याय मिळाला पाहिजे, कोणावरही न्याय होता कामा नये. लाठीहल्ल्याचे कोणीही समर्थन करत नाही. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची चूक नसताना देखील माफी मागतली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.