सातव्या महिन्यातच प्रसवकळा; नगरमध्ये 18 वर्षांच्या युवतीसाठी ‘108’ रुग्णवाहिका ठरली देवदूत
अहमदनगर : वय वर्ष अवघे 18, गरोदरपणाचा सातवा महिना, बाळाची अवस्था अत्यंत नाजूक, आईला जागेवरुन हलताही येत नव्हते… अन् अशात प्रसवकळा सुरु झाल्या. अशा या अवघडलेल्या आणि आव्हानात्मक परिस्थितीत अहमदनगरमधील (Ahmednagar) एका आई आणि बाळासाठी ‘डायल 108’ रुग्णवाहिका (‘108’ Ambulance) देवदूत ठरली आहे. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी संबंधित युवतीची अत्यंत जोखमीची प्रसुती घरीच यशस्वी केली. प्रसुतीनंतर आई आणि नवजात शिशू दोघेही सुखरुप आहेत. मात्र बाळाचे वजन खूपच कमी असल्याने त्याला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. (Dial ‘108’ Ambulance Save mother and new born baby life in Ahmednagar)
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील मिरजगाव जवळील ‘मांदळी’ गावात 18 वर्षीय युवतीला प्रसवकळा सुरु झाल्याचा ‘108’ रुग्णवाहिकेला फोन आला. सकाळी 9.40 मिनिटांनी फोन येताच मिरजगाव येथील रुग्णवाहिका तातडीने मांदळी गावाच्या दिशेने रवाना झाली. तिथे गेल्यानंतर संबंधित युवतीला प्रचंड प्रसुतीकळा होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रुग्णवाहिकेत येण्यासही युवतीचा प्रतिसाद मिळत नव्हता.
भिंगार कॅन्टोन्मेंटचा महापालिकेत समावेश? सुजय विखे हिवाळी अधिवेशनात म्हणाले…
अखेरीस रुग्णवाहिकेच्या डॉ. धनश्री गोरे आणि पायलट शरद आस्वर यांनी तिथेच घरी प्रसुती करण्याचा निर्णय घेतला आणि काही वेळताच युवतीची यशस्वी प्रसुती झाली. मात्र सातव्या महिन्यातच जन्म झाल्याने बाळाचे वजन अवघे दीड किलो भरले आहे. यानंतर बाळाला आणि आईला अहमदनगर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांवरही उपचार सुरु असून दोघांचीही प्रकृती चांगली असल्याची माहिती अहमदनगरच्या जिल्हा व्यवस्थापक डॉ. सुवर्णमाला गोखले यांनी दिली.
‘सत्ताधारी आमदार असलो तरी समाजाच्या न्यायासाठी लढणार’, आरक्षणावर लंकेंचे मोठे विधान
‘108’ रुग्णवाहिकेने नऊ वर्षांत वाचवले 81 लाखांहून अधिक रुग्णांचे प्राण :
रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘108’ ही रुग्णवाहिका सुरु करण्यात आली आहे. याच रुग्णवाहिकेमुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये राज्यातील लाखो रुग्णांना जीवदान मिळाले आहे. 2014 ते 2022 या कालावधीत राज्यातील तब्बल 81 लाख 52 हजार नागरिकांना उपयोग झाला आहे. यात हृदयविकाराचे रुग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती ते गर्भवती महिला अशा अनेक रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. राज्यातील 38 हजार 467 बाळांचा जन्म रुग्णवाहिकेत झाला आहे.