“होय, आमच्यात थोडा विसंवाद झाला, पण..” बावनकुळेंचं म्हणणं मान्य करत महाजनांचा फुलस्टॉप!

“होय, आमच्यात थोडा विसंवाद झाला, पण..” बावनकुळेंचं म्हणणं मान्य करत महाजनांचा फुलस्टॉप!

Girish Mahajan on Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून (Girish Mahajan) हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर यांनी (Sudhakar Badgujar) आज भाजपात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात झाला. विरोधकांना जो राजकीय संदेश द्यायचा तो भाजपने दिलाही. पण यातच एक मोठा ट्विस्टही आला. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाची मला कल्पना नव्हती असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना सांगितले. यात काय राजकारण याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर बावनकुळे यांनी स्वतःच स्पष्टीकरण देत यावर प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा आमच्यात थोडा विसंवाद झाल्याचं मान्य केलं.

आमच्यात थोडा विसंवाद झाला पण.. 

या प्रकारावर पत्रकारांनी गिरीश महाजन यांना प्रश्न विचारला. त्यावर महाजन म्हणाले, बावनकुळेंचं म्हणणं खरं आहे. आमच्यात थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं. मी काल पुण्याहून दुपारी निघालो होतो तो सात ते आठ वाजता येथे आलो. मला ताप आला होता. त्यामुळे मला उठायला उशीर झाला. त्यामुळे आमच्यात संवाद झाला नाही. मला वाटलं जिल्ह्यातल्या लोकांनी आमंत्रणं दिली असतील पण थोडं मिसकम्युनिकेशन झालं. पण काही हरकत नाही हा आमचा घरचा कार्यक्रम आहे. पक्षातील अंतर्गत बाब आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की अजून मला तारीख कळालेली नाही.

पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज घ्यायचा की दोन तीन दिवसांनी घ्यायचा याबाबत थोडा संभ्रम होता. पण आज अचानक निर्णय झाला आणि पक्षप्रवेश झाला. त्यामुळे याबाबतीत आमच्यात कुठेही मनभेद आणि मतभेद नाहीत, अशी सारवासारव महाजन यांनी केली.

ज्यावेळी आम्ही निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढतो तेव्हा थोडी टीका होते. काही शब्द वापरले जातात त्यामुळे आक्षेप निश्चितच असतो. पण आम्हालाही आमचा पक्ष वाढवायचा आहे. आम्हाला पुन्हा महापालिका ताकदीने लढायची आहे. नाशिक महापालिकेसाठी आमचं उद्दीष्ट ठरलं आहे. ज्यांना पक्षात घेतलं ते तीन चार वेळा निवडून आलेले आहेत. मुरब्बी नेते आहेत. काही आपसातले वाद असतील तर ते मिटवले जातील.

बडगुजरांचा प्रवेश फायद्याचा 

आता आमच्या काळात मंत्री असलेले अनेक जण मागच्या काळात टीका करत होते. पण आता ते एकरूप झाले आहेत. त्यामुळे आज जो प्रवेश झाला तो भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने निश्चितच फायद्याचा आहे. यामुळे भाजपची ताकद वाढणार आहे. याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Maharashtra Local Body Elections) पहायला मिळेल.

भाजप नेत्यांची आधी आगपाखड आता स्तुतिसुमने; सुधाकर बडगुजर येताच ‘पवित्र’ झाले…

बावनकुळे अनभिज्ञ

सुधाकर बडगुजर आपल्या कार्यकर्त्यांसह नाशिकवरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले असताना सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर आली होती. बडगुजर यांच्या प्रवेशाबद्दल कुठलीही माहिती आपल्याकडे नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. भाजपात स्थानिक टीम, पदाधिकारी, खासदार आमदार यांच्यासोबतच्या चर्चेअंती एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नसल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले होतं. त्यामुळे बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिकांचा विरोध असल्याचे आणि प्रदेशाध्यक्षचं अनभिज्ञ असल्याचे चित्र तयार झालं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube